Published On : Sat, Jun 5th, 2021

आपत्ती व्यवस्थापनासाठी मनपा प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर

नियंत्रण कक्ष कार्यान्वित : अधिकाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या

नागपूर : मृग नक्षत्राचे आगमन होत आहे. हवामान खात्याने यंदा उत्तम पावसाचा अंदाज वर्तविल्याने अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता नागपूर महानगरपालिका प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर आले आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्व अधिकाऱ्यांना विविध जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मनपा केंद्रीय कार्यालयातील अग्निशमन विभागात एक नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून तो २४ तास सुरू राहील.

यासंदर्भात नुकताच मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाने एक आदेश जारी केला असून आपत्ती व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्यांबाबत यात सविस्तर नमूद करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे शिकस्त घरे पडणे, रस्त्यांवरील झाडे कोसळणे, वाहतुकीच्या मुख्य रस्त्यावर तसेच अंतर्गत रस्त्यावर पाणी साचून राहणे आदी बाबी प्रामुख्याने आढळून येतात. पावसामुळे जीवित हानी व वित्त हानी होणार नाही याकरिता या उपाययोजना आवश्यक असून याबाबत संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत संपूर्ण शहर स्तरावरील घटना प्रतिसाद प्रणालीचे इंसिडंट कमांडर अतिरिक्त आयुक्त (शहर) आहेत. या प्रणालीचे नियोजन विभाग प्रमुख सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आहेत. त्यांच्या नियंत्रणात रिस्पॉन्स ब्रॅन्च हेड कार्यरत राहतील. १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी प्रत्येकी दिवसांसाठी एक-एक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रमाणेच नियंत्रण कक्षामध्ये उपविभागीय अभियंता/अधिकारी नियंत्रण कक्षात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवून नियंत्रण प्रमुखांशी समन्वय साधतील. सतत पाऊस आल्यास नियंत्रण कक्षात व्यक्तीश: उपस्थित राहतील.

यासाठीही १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी प्रत्येकी १० दिवसांसाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी त्यांच्या कार्य कालावधीत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या चार चमू तयार करतील. या चार चमूचे कार्य वेगवेगळे राहतील. पहिली चमू शहरात कोसळणारी झाडे दूर करण्याचे कार्य करतील. दुसरी चमू सखल भागात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी राहील. तिसरी चमू विद्युत वाहिनी, विद्युत खांबांवरील पथदिवे आदींची पडझड यावर लक्ष ठेवतील तर चवथ्या क्रमांकाची चमू कोसळलेल्या घरांचा मलबा हटविण्याचे कार्य करेल.

सर्व वॉर्ड अधिकारी यांनी आपतकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्या स्तरावर आवश्यक यंत्रणा सुसज्ज ठेवावी, रात्रपाळीत आरोग्य विभागाचा आरोग्य निरिक्षक/कनिष्ठ अभियंता/स्थापत्य अभियांत्रिकी सहायक उपस्थित राहतील, याप्रमाणे व्यवस्था करण्याचे निर्देश झोनल कार्यालयांना देण्यात आले आहेत. अतिवृष्टीमुळे खोलगट भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असते. अशा वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यास तेथील रहिवाशांना स्थानांतरित करण्याच्या दृष्टीने मनपाच्या लगतच्या परिसरातील शाळा/समाजमंदिरे आदी बाबतची यादी संबंधित मुख्याध्यापक, व्यक्ती यांचे पूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, चौकीदाराचे नाव आदी यंत्रणेसह सुसज्ज करण्यासंबंधीची जबाबदारी सहायक आयुक्तांना सोपविण्यात आली आहे.


२४ तास नियंत्रण कक्ष
शहरात होणाऱ्या नुकसानीची माहिती मिळण्यासाठी आणि नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी मनपाने अग्निशमन विभागात नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. हा नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित राहील. नियंत्रण कक्षात अधिकारी व कर्मचारी यांची दोन-तीन पाळीत सेवा उपलब्ध करण्यात येत आहे. नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५६७०२९, ०७१२-२५६७७७७ असा राहील. आपतकालीन कक्ष, सिव्हील मुख्यालय अग्निशमन केंद्र येथील दूरध्वनी क्र. ०७१२-२५४०२९९, ०७१२-२५४०१८८, १०१, १०८ आणि भ्रमणध्वनी क्रमांक ७०३०९७२२०० असा राहील.