Published On : Sat, Jun 5th, 2021

रा.तु.म.नागपूर विद्यापीठ डायग्नोसीस केंद्रातील कार्याचे महापौरांनी केले कौतुक

प्राध्यापक-विद्यार्थ्यांच्या समर्पण भावनेची केली सदिच्छा भेटीत प्रशंसा

नागपूर : कोरोना लॉकडाऊनच्या काळात राष्ट्रसंतांच्या मानवसेवेचा वसा जपत, विज्ञानातील संशोधनाची मानव जीवनासाठी उपयोगिता आणि सामाजिक बांधिलकी या भूमिकेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने कोविड-१९ निदान केंद्र स्थापन करत कोरोना निदानासाठी आरटीपीसीआर चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळा उभारली. सामाजिक भावनेतून विद्यापीठाने केलेले हे कार्य नक्कीच अभिनंदनास पात्र आहे, अशी भावना महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केली.

महापौरांनी नुकतीच विद्यापीठाच्या कोविड-१९ डायग्नोसीस केंद्राला सदिच्छा भेट घेतली. संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर विद्यापीठाने केलेल्या या कार्याचे कौतुक केले. विद्यापीठाच्या कोविड-१९ डायग्नोसीस केंद्रात २५ ऑगस्ट २०२० पासून आजपर्यंत एकूण ९५१७८ नमुन्यांचे यशस्वीरित्या विश्लेषण २८४ दिवसांत करण्यात आलेले आहे. यापैकी ८५८९० नमुने हे मॅन्युअल पद्धतीने आर.एन.ए. एक्स्ट्रॅशन केले आहेत. १० मे २०२१ पासून या प्रयोगशाळेत आर.एन.ए. एक्स्ट्रॅशन (RNA EXTRACTION) सयंत्र कार्यान्वित झाले आहे. या प्रयोगशाळेत दोन आर.टी.-पी.सी.आर. संयंत्र उपलब्ध असल्यामुळे दैनिक स्वरुपात किमान ८०० नमुने विनाविलंब तपासले जातात. आर.एन.ए. एक्स्ट्रॅशन व आर.टी.पी.सी.आर. करण्याकरिता डॉ. अमित ताकसांडे यांचे बहुमूल्य योगदान आहे. डॉ. अमित ताकसांडे (बायोकेमिस्ट्री) यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर येथून रीतसर प्रशिक्षण प्राप्त केलेले आहे. सर्व तांत्रिक बाजू सांभाळत असतानाच, उत्कृष्ट टीम लीडर म्हणून त्यांनी आपल्या चमुचे मनोधैर्य आणि कामाप्रति निष्ठा अथकपणे टिकवून ठेवलेली आहे.

योगेश मुदलियार, अक्षय मुटे, शिवम खापेकर व प्रणव थोटे हे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून समीर ठाकरे, अंताराम रोहणकर व प्राची बनसोड, वै द्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ म्हणून डॉ. प्रीती कुलकर्णी कार्यरत आहेत. कोविड केंद्रात बायोकेमिस्ट्री व बायोटेक्नॉलॉजी विभागातील १६ विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून या आपत्ती काळात मोलाचे योगदान दिले. स्वयंसेवक विद्यार्थ्यांच्या कामाची नोंद घेत कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी ‘कमवा व शिका’ या योजने अंतर्गत १६ स्वयंसेवक विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मंजूर केले.

यात कौस्तुभ दांडेकर, शुभम मुराई, रितेश अतकरी, गौरव कुडे, आभा घोराडकर, अंकिता इंगळे, अक्षिता भनारकर, गौरी साधनकर, मीनल भुरे, समृद्धी डेंगे, श्रुती जारोंडे, विराज्ना नंदेश्वर, शरयु गडकिने, रिया शहारे, रूपल रामटेके, रुपल सालवनकर, मृणाल डोंगरे व अमित दुर्गम या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नोडल अधिकारी म्हणून रसायनशास्त्र विभागाचे प्रा. नंदकिशोर करडे हे विद्यापीठाच्या कोविड-१९ निदान केंद्रात कार्यरत आहे. विद्यापीठातील केंद्र जनसेवेसाठी उपलब्ध राहण्यासाठी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे सातत्यापूर्ण पाठबळामुळे केंद्र प्रगतीपथावर आहे.

रा.तु.म. नागपूर विद्यापीठ येथील केंद्राला ४ जून रोजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांचासह भेट देऊन पाहणी केली. या चाचणी केंद्राच्या कामाची महापौरांनी प्रशंसा केली आणि समाधान व्यक्त केले. शैक्षणिक संस्थेने समाजाप्रती दाखवलेल्या आस्थेबद्दल त्यांनी चाचणी केंद्रातील चमूचे विशेष कौतुक केले.