Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sun, Jun 21st, 2020

  मुंढे साहेब, आम्ही आपली वाट बघत आहोत…!

  फेसबुकवर महापौरांची भावनिक पोस्ट : सभागृहात येण्याची आयुक्तांना केली विनंती*

  *नागपूर, ता. २१ :* नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत जे घडायला नको होतं ते घडलं. सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे न देता आपला अपमान झाल्याचे सांगत त्यांनी चक्क सभागृह सोडले. नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासातील अशी पहिलीच घटना आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापौर संदीप जोशी यांनी स्वत: आयुक्तांना पत्र लिहून २३ तारखेला सकाळी ११ वाजता होणाऱ्या सभागृहात हजर राहून मनाचा मोठेपणा दाखवावा, अशी विनंती केली आहे. हे विनंती करणारे पत्र आयुक्तांना पाठवित फेसबुकवरही पोस्ट केले. महापौरांनी आयुक्तांना विनंती करणारे भावनिक पत्र लिहावे, अशी घटनाही प्रथमच होत असून सोशल मीडियावर हे पत्र चांगलेच व्हायरल होत आहे.

  ही व्हायरल होणारी पोस्ट आणि पत्रातील मजकूर यामुळे सभागृहात नेमके काय झाले, याचा प्रत्येकाला बोध होईल. या सर्व प्रकरणामुळे आयुक्तांनी मनाचा मोठेपणा दाखवत सभागृहात यावे, अशी भावना नेटकरी व्यक्त करीत आहे.

  *पत्रातील मजकूर*

  नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात काल अर्थात दि. 20 जून रोजी दुर्देवी तितकीच क्लेशदायक घटना घडली. आपल्या निमीत्ताने ती घडावी याचे मला अत्यंत वाईट वाटते. आपले नाव नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात घटनेची पायमल्ली करतांना नोंदविले जाणे हे दुर्दैवी आहे. कदाचित ते आपल्या दृष्टीनी वाईट नसेलही, परंतू माझ्या महापौर पदाच्या काळात ही घटना नोंदविली जावी याचे मला अतीव दुःख आहे. याबाबत म.न.पा. सभागृहाने तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे.

  मुंढे साहेब, सभागृहाचे काही नियम असतात. (खरे म्हणजे हे मी सांगावे याची गरज नाही.) लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांचे काही अधिकार असतात. सभागृहात नगरसेवक माहिती देण्यासाठी बोलत असेल किंवा अधिकारी उत्तर देत असेल तर कुठलाही नगरसेवक ‘पॉईंट ऑफ ऑर्डर’ अथवा ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ या खाली बोलणाऱ्याला मध्ये थांबवून आक्षेप नोंदवू शकतो. नगरसेवक हरिश ग्वालबंशी यांच्या प्रश्नावर आपण उत्तर देत असतांना ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकरजी तिवारी यांनी ”पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन“ घेतले. मी बोलत असताना कुणीही मध्ये बोलू नये ही आपली चुकीची भूमिका संपूर्ण सभागृहाने अनुभवली. याचवेळी ‘मी सभागृहात थांबत नाही’ अशी भावना आपण मला बोलूनही दाखविली, परंतु थांबलात, त्यानंतर लगेच नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांनी आपल्या नावा संदर्भात काही शब्दच्छल केला ज्याचे समर्थन कुणीही करणार नाही. हे शब्द सभागृहाच्या रेकॉर्ड वरून काढण्यास आपण विनंती केली असती तर ते काढण्याचे आदेश मी तात्काळ दिले असते. सभागृहात असे प्रकार अनेकदा होतात. गैर शब्द, अपशब्दांचा वापरही होतो. मात्र असे काही घडले तर ते रेकॉर्डवर न घेण्यास सदस्य सुचवितात. त्याची नोंद घेतल्या जाते. मात्र तसे काही न करता सरळ सभागृहाचाच त्याग करणे हे वर्तन ‘आयुक्त’ या पदाची गरिमा, सभागृहाची गरिमा, तसेच लोकशाहीची गरिमा कलंकित करणारी आहे.

  त्यानंतरही आपण सभागृहात यावे, सभागृहाची गरिमा कायम राहावी यासाठी मी दिलेल्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्तांनी आपल्याला भ्रमणध्वनीवरून सभागृहात येण्याची विनंती केली. मी सुध्दा आपणास भ्रमणध्वनीवरून सभागृहात येण्याची विनंती केली. मात्र ‘जिथे माझा अपमान होत असेल तिथे मी येणारच नाही’ अशीच भूमिका कायम ठेवली. ही भूमिका सभागृहाच्या दृष्टीने आणि शहर विकासाच्या दृष्टीने अत्यंत हानीकारक आहे.

  शनिवारी सभागृहाबाहेर एकीकडे तीन महिन्यांपासून पगार न मिळालेले ‘आपली बस’चे कर्मचारी, आपल्या हक्कासाठी शांतपणे फलक हातात धरून असलेले दिव्यांग बांधव होते तर दुसरीकडे आपल्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणारे 15-20 कार्यकर्ते होते. राजकिय नेत्यांचेही समर्थक असतात, तसे या शहरात आपलेही समर्थक असावे. एखाद्या राजकिय नेत्याला तिकिट मिळाली नाही, त्याचेवर अन्याय झाला तर त्याचे समर्थक राडा करतात, घोषणाबाजी करतात. परंतु अशा समर्थकांची समजूत घालणे हे त्या नेत्यांचे कर्तव्य असते. तसे झाले नाही तर घोषणाबाजी करणारे समर्थक त्या नेत्याने मुद्दाम आणले असा गैरसमज निर्माण होतो. काल सभागृहाबाहेर आपल्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणारे व्यक्ती कदाचित आपल्या परिचयाचे नसावेत, मात्र आपल्या फोटोचे मास्क, आपल्या फोटोचे बॅनर आपल्या नावाच्या घोषणा ते करीत असताना आपण जर त्यांची समजूत काढली असती आणि घोषणाबाजी पासून थांबविले असते तर सभागृहाबाहेरचे हे चित्र थांबले असते व आपला मोठेपणा नागपूरकरांनी अनुभवला असता. मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही.

  महोदय, कोविड-19 च्या काळात या शहराला आपली गरज आहे. मात्र कुठेतरी जनप्रतिनिधींशी संवाद ठेवणे, त्यांचेही कधी-कधी ऐकून घेणे (प्रत्येकवेळी चुकीचेच सांगतील असे नाही) क्रमप्राप्त ठरते. कारण आज पावसाच्या पाण्यामुळे लोकांच्या घरात पाणी घुसले आहे, गडरचे चेंबर तुटली आहेत, घाण पाणी घरात घुसले आहे, पावसाळी नाल्या तुंबल्या आहे असे असताना शहरातील जनता नगरसेवकांच्या घरावर जात असते, शिव्याशाप देते. त्यामुळे नगरसेवक हा देखिल अडचणीत असतो. आपण 6 जून च्या बैठकीत अशी आवश्यक कामे तात्काळ सुरू करून देऊ, असे आश्वासन आपण मला दिले होते. आज 15 दिवस होऊनही त्या कामांना प्रारंभ नाही अन् त्यामुळे नगरसेवक 2000 – 3000 रू.चे चेंबरही बनवू शकत नाही ही सत्यस्थिती आहे. कृपया याची आपण दखल घ्यावी ही विनंती.

  महोदय, मनपा कायदयानुसार सभागृह हे सार्वभौम आहे. आपण सभागृहातून निघून जाणे हा सभागृहाचा अपमान आहे. आपण राग सोडून सभागृहात परत यावे ही सभागृहाची भावना आहे. त्यामुळेच सभागृह आपल्यासाठी स्थगित केले आहे. आपण राग मनातून काढून टाकावा आणि मंगळवार दि. 23 जून रोजी सकाळी 11 वा. सभागृहात मनाचा मोठेपणा दाखवून उपस्थित राहावे, अशी विनंती सभागृहाचा प्रमुख म्हणून व महापौर या नात्याने मी आपणास करीत आहे.

  खरं तर महापौरांनी आयुक्तांना विनंती नव्हे तर निर्देश दयावे अशी प्रथा व परंपरा आहे. तरीही या प्रथा, परंपरांना नम्रपणे बाजूला ठेवून मी आपणास पुन्हा एकदा विनंती करीत आहे आपण यावे आम्ही आपली वाट बघत आहोत.

  ह्या पत्राच्या माध्यमातून महापौरांनी आयुक्तांना केलेली विनंती हा चर्चेचा विषय ठरत आहे. महापौरसारख्या व्यक्तीच्या या भावनिक पत्राची दखल घेऊन आयुक्त तुकाराम मुंढे बैठकीला हजर राहतील की या पत्रालाही केराची टोपली दाखवतील, याकडे आता नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145