Published On : Sat, Mar 21st, 2020

मुंढे साहेब, ही ‘हिरोगिरी’ अंगलट आली तर…..

नागपुर : सध्या संपूर्ण देशभरात एकाच गोष्टीची चर्चा आहे. ती म्हणजे ‘कोरोना’ विषाणूची. या विषाणूने संपूर्ण देशवासीयांच्या मनात धडकी भरविली असली तरी काही जण याचा फायदा घेते ‘हिरोगिरी’ ‘चमकोगिरी’चे प्रकार करण्यात व्यस्त आहेत. नागपुरात कलम १४४ अर्थात जमावबंदी आदेश लागू झाला आहे. जेव्हा-जेव्हा ही कलम लागू होते, त्याचे गांभीर्य सामान्य जनतेला राहात नाही. मात्र, सध्याची परिस्थिती अशी आहे की या परिस्थितीत हा जमावबंदी आदेश सर्वांनाच लागू करणे, विशेष म्हणजे त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे हे नागरिकांसोबतच प्रत्येक अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे.

मात्र, नागपुरात लोकांना ब्रह्मज्ञान देणारे काही अधिकारी मात्र, स्वत:च या आदेशाचे उल्लंघन करीत असल्याची बाब आज सकाळी अनुभवास आली. इतकेच नव्हे तर ज्या-ज्या सामान्य नागरिकांनी हे चित्र बघितले, त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही, असेच हे चित्र होते.

निमित्त होते नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नागपूर शहरातील दौऱ्याचे. गुरुवारी २० मार्चला मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कान्फरसिंगच्या माध्यमातून नागपुरातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांशी संवाद साधत नागपुरातील परिस्थितीचे गांभीर्य जाणून घेतले. नागपूर शहर ‘लॉक डाऊन’ करण्याचे आदेश निघाले. संपूर्ण जिल्ह्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तर नागपूर शहरासाठी मनपा आयुक्तांनी त्यासंदर्भात आदेश काढले. विशेष म्हणजे खुद्द पालकमंत्री डॉ. नितीन राऊत आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रपरिषदेतून यासंदर्भात माहिती दिली. इतके पुरे झाले नाही, म्हणून की काय, रात्री ९ वाजता स्वत: मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रपरिषद बोलावून तीच माहिती पुन्हा मीडियाला दिली. यानंतर या आदेशाचे पालन होते की नाही, यासाठी सकाळीच नागपुरातील बाजारपेठांचा दौरा आयोजित केला. ते स्वत: निघाले त्यात काही गैर नाही.

मात्र, आपण दौऱ्यावर जातोय ही माहिती पद्धतशीरपणे जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मीडियाला पोहचविण्यात आली. मग काय बघता, सध्या कोरोना हाच ‘हॉट’ टॉपिक असल्याने आणि त्यातल्या त्यात ‘मुंढे’ हिरो असल्याने मीडियाला पुन्हा एक बातमीचा विषय भेटला. झाडून पुसून सारेच इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे प्रतिनिधी आणि त्यांचे कॅमेऱ्यामन मुंढे साहेबांच्या दौऱ्यात पोहचले. महत्त्वाचे म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया पोहचेपर्यंत मुंढे साहेबांचा दौरा ‘स्टार्ट’ झालेला नव्हता. जशी मीडिया पोहचली, साहेबांचा दौरा सुरू झाला आणि रस्त्यावर एकच गर्दी झाली.

सांगायचे तात्पर्य असे की, अधिकाऱ्यांना जे कर्तव्य निभवायचे आहे, ते त्यांनी कुठलाही गाजावाजा न करता निभावले तरी त्याचा इफेक्ट तेवढाच होईल, आणि आदेशाच्या अंमलबजावणीचा संदेश द्यायचा उद्देश साध्य होईल.

मात्र, तसे न करता मीडियाची गर्दी करून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे स्वत:च वेळोवेळी कायद्याचे उल्लंघन करीत आहेत. कुठलेही तीन फुटाचे अंतर न ठेवता सुमारे २५ ते ३० मीडियाचे कॅमेरामन आणि प्रतिनिधी आणि काय चालले म्हणून जमा झालेले नागरिक असे शंभरावर लोक एकत्र करण्याचा प्रताप साहेबांनी केला. हे पुरे झाले नाही म्हणून की काय, पुन्हा १ वाजता पत्रपरिषद बोलावून ५० जण एकत्र बोलावले. गर्दी करू नका, असे आवाहन याच पत्रपरिषदेत करण्यात आले.

महत्त्वाचा मुददा असा की जो संदेश प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवायचा आहे, त्यासाठी मनपाचा जनसंपर्क विभाग सक्षम आहे. जे काही सांगायचे आहे, ते वेळोवेळी पत्रपरिषद घेऊनच सांगावे, असे आवश्यक नाही ना! जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून ही माहिती देता येते. मग वेळोवळी पत्रकारांना आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला बोलावून आयुक्त तुकाराम मुंढे यांना काय साध्य करायचे आहे, हा सामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकार, पोलिस आयुक्तांसारखे अधिकारी मात्र या बाबी स्वत: पाळत आहे.

यातून हेच लक्षात येते की कोरोनासाठी आम्ही किती तत्पर आहोत, हे सांगण्यासाठी आणि त्याचा फायदा उचलून मीडियाच्या माध्यमातनू ‘हिरो’ बनण्यासाठी तर हा सारा खटाटोप नाही ना? ह्या प्रश्नाचे उत्तर मुंढे साहेबांच्या आतापर्यंत संपर्कात आलेल्या सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना एव्हाना माहिती झाले आहे.

मुंढे साहेब प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि कार्यतत्पर अधिकारी असले तरी सामान्य नागरिक म्हणून एकच सल्ला आहे, साहेब किमान या समयी असे करु नका. ही ‘हिरोगिरी’ अंगलट आली तर……!