Published On : Thu, Sep 6th, 2018

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दहा गाड्यांची एकमेकांना धडक

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज अत्यंत विचित्र अपघात झाला. एक्सप्रेस वे वर आज सकाळी १० गाड्यांनी एकमेकांना धडक दिल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला असून या वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात फूड मॉलजवळ हा भीषण अपघात झाला. ५ कार, एक टेम्पो आणि ४ ट्रक एकमेकांना धडकल्या. या अपघातात कारचा प्रचंड चेंदामेंदा झाला. या विचित्र अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. या घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

खोपोलीतही गाड्या धडकल्या
बोरघाटाप्रमाणेच खोपोलीतही ट्रकने कंटेनरला धडक दिल्याने चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे खोपोलीत वाहतुकीची कोंडी झाली. मात्र वाहतूक पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन ही वाहतूक कोंडी दूर केली.