Published On : Wed, Dec 18th, 2019

मुकेश सारवान यांनी घेतला सफाई कर्मचा-यांच्या समस्यांचा आढावा

Advertisement

नगपूर,: सफाई कर्मचा-यांच्या विविध समस्यांसंदर्भात बुधवारी (ता.१८) महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, स्थावर अधिकारी राजेंद्र अंबारे, श्री.मोटघरे, किशोर समुंद्रे, विनोद चव्हाण, अशोक सोलंकी, प्रभाकर घिंगट, बाबु जेठवा, संजय राजसेवते, विक्की बढेल, रवी मधुमटके, दिलीप बैरवार, सोमसिंग दुग्गल, बबलु कोंढावे, प्रफुल्ल सारवात, अमन सारवान, शाहरूख पिंजारी आदी उपस्थित होते.

यावेळी विविध सफाई कर्मचा-यांच्या प्रतिनिधींनी सफाई कर्मचा-यांच्या समस्या मांडल्या. सफाई कर्मचा-यांना महिन्याच्या ७ तारखेपर्यंत वेतन न मिळाल्यास त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सफाई कर्मचा-यांना दर महिन्याला ७ तारखेच्या आत वेतन देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी दिले. याशिवाय लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचा-यांच्या जातीचा विचार न करता त्यांच्या शैक्षणिक योग्येतेनुसार नियुक्ती व पदोन्नती देण्याबाबतही कार्यवाहीचे त्यांनी निर्देश दिले.

सफाई कर्मचारी व त्यांच्या बेरोजगार मुलांसाठी मनपाद्वारे निर्मित व्यापारी संकुलामध्ये राखीव गाळे ठेवले जात नाही. सफाई कर्मचा-यांच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांच्याकरीता गाळे राखीव ठेवणे. याशिवाय डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेंतर्गत सफाई कामगारांना घर दिले जाते. मात्र जागेच्या अभावाने ही योजना पूर्णत्वास येउ शकली नाही. यावर आवश्यक ती सर्व कार्यवाही करीत येत्या ६ महिन्यात जागा उपलब्ध करून द्यावी, योजनेसाठी आवश्यक निधीबाबत आपण स्वत: पाठपुरावा करू, असेही महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी सांगितले.

सफाई कर्मचा-यांच्या अनेक अडचणी आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात यावी. समितीतील तिन्ही सदस्य हे सफाई कर्मचारीच असावेत व समितीतील सदस्यांची निवड सफाई कर्मचा-यांच्या विविध संघटनांनी सामंजस्याने करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.