Published On : Wed, Dec 18th, 2019

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा!

चिल्ड्रेन ट्राफिक पार्कमध्ये नागरिकांची महापौरांकडे मागणी : ‘वॉक अँड टॉक विथ मेयर’

नागपूर : संपूर्ण शहरात मोकाट कुत्र्यांचा सर्वत्र हैदोस आहे. रात्री वाहनांच्या मागे कुत्रे धावतात. अनेकांना चावाही घेतला आहे. मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे लहान मुलेही घराबाहेर पडायला घाबरतात. त्यामुळे याबाबत गांभीर्याने लक्ष देउन मोकाट कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करा, अशी मागणी चिल्ड्रेन ट्राफिक पार्कमध्ये महापौर संदीप जोशी यांना येथील नागरिकांनी केली.

‘वॉक अँड टॉक विथ मेयर’ उपक्रमांतर्गत बुधवारी (ता.१८) महापौर संदीप जोशी यांनी धरमपेठ येथील चिल्ड्रेन ट्राफिक पार्कमध्ये नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी नगरसेविका रूपा राय, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्ष शिवाणी दाणी आदी उपस्थित होते.

यावेळी नागरिकांनी विविध समस्या आणि तक्रारी महापौरांपुढे मांडल्या. भाग्यश्री काळे यांनी चिल्ड्रेन ट्राफिक पार्कमध्ये लहान मुलांची खेळणी खराब झालेली असून पावसाळ्यात पार्कमध्ये पाणी साचत असल्याने परिसरात डासांचा त्रास असल्याबाबत तक्रार मांडली. शिवाय हिवाळ्यात सायंकाळी पाच वाजतापूर्वी पार्क सुरू करण्याचीही मागणी केली. निर्माल्य संकलनासाठी पार्कपुढे निर्माल्य कलश लावण्याची मागणी उदय पांडे यांनी केली. चिल्ड्रेन ट्राफिक पार्कमध्ये मुलांना खेळण्यासाठी पुरेश्या साहित्यांची मागणी गोपीकिशन तिवडा यांनी केली. विवेक चौबे यांनी पार्कमधील पुलामुळे होणा-या त्रासाबाबत अवगत केले. सायंकाळी पुलाच्या मागे असामाजिक तत्त्वांचा वावर असतो. याशिवाय परिसरात तयार झालेल्या हॉटेलमुळे रस्त्यावर वाहने पार्क केली जात असल्याची तक्रार केली.

परिसरात हॉटेल उघडले जात आहेत मात्र कोणत्याही प्रकारची पार्कींगची व्यवस्था नसल्याने या हॉटेलमध्ये येणा-यांची वाहने रस्त्यावर पार्क होत असल्याने नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे पार्कींग जागा नसल्यास हॉटेलची परवानगी देउ नये, अशी मागणी राजेश व्यवहारे व नीता चौबे यांनी केली. याशिवाय हॉटेल्समधील भांडी फुटपाथवर धुतली जात असल्याने परिसरात अस्वच्छता पसरत असल्याचे रश्मी बक्षी यांनी सांगितले.

उद्यानांमध्ये खाण्याच्या पदार्थांच्या स्टॉल्सना परवानगी दिल्यास उद्यानात अस्वच्छता होतेच शिवाय असामाजिक तत्वांचाही वावर वाढतो. त्यामुळे शहरातील कुठल्याही उद्यानामध्ये कोणतेही फूड स्टॉल्स लावण्यात येउ नये, अशी मागणी विवेक रानडे यांनी केली. श्री.बारशिंगे यांच्या कार्याचा गौरव म्हणून चिल्ड्रेन ट्राफिक पार्कमध्ये त्यांचा पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पार्कमध्ये मागच्या बाजुला असलेला पुतळा दर्शनी भागात आणण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी प्रा.प्रकाश घवघवे यांनी केली. शहराचा सर्वांगिण विकास होत असताना लहान मुलांसाठी मनोरंजक उद्यान असावे, अशी सूचना योगेश टिचकुले यांनी मांडली. रस्त्यावरील मोकाट गायींसह कुत्र्यांच्या समस्येबाबत नाचिकेत काळे यांनी अवगत केले. याशिवाय डॉ.सुलोचना पाठक, गंगाधर कराडे, निर्मला कोटांगळे, डॉ.अशोक पाठक यांनीही आपल्या सूचना व तक्रारी मांडल्या.

जानेवारीपासून सुरू होणार फुटपाथ दुरूस्ती : महापौर संदीप जोशी
फुटपाथवरील अतिक्रमण, फुटपाथची दुरावस्था, चालण्यायोग्य नसलेले फुटपाथ अशा अनेक तक्रारी दररोजच प्राप्त होतात. संपूर्ण शहरात अतिक्रमणाची समस्या आहे ती सोडविण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. त्यातूनच सर्वात आधी फुटपाथची स्थिती सुधारली जाणार आहे. याबाबत येत्या जानेवारीपासून फुटपाथ दुरूस्ती सुरू केली जाईल, असे महापौर संदीप जोशी यांनी यावेळी सांगितले.

मोकाट कुत्र्यांच्या बाबतीत मनपा गंभीर आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कुत्र्यांची नसबंदी केली जाणार आहे. यापूर्वी नसबंदीसाठी शहरातील एकच स्वयंसेवी संस्था कार्य करीत होती. त्यामुळे नसबंदीचा आकडा वाढला नाही. ही बाब लक्षात घेत आता मुंबई व पुणे येथील स्वयंसेवी संस्थांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात शहरातील सुमारे ९० हजार कुत्र्यांची नसबंदी केली जाईल, असेही महापौरांनी सांगितले.

विद्युत दिव्यांच्या अभावाने चिल्ड्रेन ट्राफिक पार्कमध्ये अंधार असल्याची तक्रार अजय अग्रवाल व अशोक नगरकर यांनी केली. यावर दखल घेत महापौर संदीप जोशी यांनी उद्यानात १० विद्युत दिवे लावण्याबाबत ताबडतोब कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. याशिवाय उद्यानात ग्रीन जिममध्ये आणखी एक सायकल लावण्याची शरद भावे यांची मागणी मान्य करत येत्या चार दिवसात सायकल उपलब्ध करण्याचेही त्यांनी निर्देशित केले. उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकांच्या खोलीमध्ये जुनी रद्दी ठेवल्याने सुरक्षा रक्षकांना होणारी अडचण उद्यानातील नागरिकांनी लक्षात आणून दिली. या खोलीतील रद्दी तीन दिवसात ताबडतोब काढून जागा मोकळी करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. परिसरातील व्यावसायीक इमारतींमध्ये बार, पब आदी उघडले जात आहेत. शैक्षणिक हब म्हणून ओळख असलेल्या धरमपेठ परिसराचे वातावरण दुषित होत असल्याची तक्रार रघुवीर जोशी व नितीन साठे यांनी केली. व्यावसायिक इमारतींसंदर्भात जिल्हाधिका-यांची भेट घेतली आहे. धरमपेठमधीलही व्यावसायिक इमारतींचा अहवाल मागविला असून याबाबत योग्रू निर्णय घेण्यात येईल, असे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.

हल्ल्यानंतरही महापौर पोहोचले लोकांच्या समस्या ऐकण्यास
अतिक्रमण आणि अन्य विषयांच्या अनुषंगाने घेण्यात येत असलेल्या कठोर निर्णयाचा विरोध म्हणून मागील काही दिवसांमध्ये महापौर संदीप जोशी यांना धमकीचे पत्र दिले जात होते. मंगळवारी (ता.१७) रात्री अज्ञात हल्लेखोरांनी महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर गोळीबार केला. या हल्ल्यातून महापौर थोडक्यात बचावले. मध्यरात्री घडलेल्या या थरारक घटनेनंतर बुधवारी (ता.१८) नियोजित चिल्ड्रेन ट्राफिक पार्क येथील ‘वॉक अँड टॉक विथ मेयर’ उपक्रमामध्ये महापौर उपस्थित राहणार नाही, अशीच चर्चा होती. मात्र सकाळी अगदी ७.३० वाजता महापौर संदीप जोशी चिल्ड्रेन ट्राफिक पार्क येथे पोहोचले, नागरिकांशी संवाद साधला आणि प्रशासनाला आवश्यक निर्देशही दिले. एवढ्या मोठ्या हल्ल्यानंतर अगदी नेहमीप्रमाणे महापौरांची वागणूक आणि चेह-यावरील हास्य पाहून उपस्थित नागरिकांनीही त्यांच्या धैर्याला दाद दिली व करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले.