Published On : Wed, Jun 30th, 2021

थकबाकीदारांच्या विरोधात महावितरण आक्रमक ११ हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित

नागपूर: महावितरणकडून वारंवार आवाहन करूनही वापरलेल्या वीज देयकाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील १० हजार ८०० वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला.थकबाकीदार ग्राहकांकडे ३३१ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

महावितरण कडून नागपूर शहरासह वर्धा जिल्ह्यातील विवीध भागात वीज ग्राहकाकडून वापरलेल्या वीज देयकाची रक्कम वसुलीची मोहीम जून महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू केली आहे. मोठ्या प्रमाणात वीज ग्राहक महावितणच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन थकबाकी असलेली रक्कम भरून सहकार्य करीत आहे. पण अनेक ग्राहक वारंवार आवाहन करूनही दाद देत नसल्याने अखेरीस महावितरणकडून कटू कारवाई करून नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील सुमारे ११ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला.

महावितरणच्या महाल विभागाच्या वतीने बोरकर नगर, बारा सिग्नल, रामबाग परिसरात व्यापक राबविण्यात आली. या परिसरातील ३० थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तोडण्यात आला. या थकबाकीदार वीज ग्राहकांनी ३४ लाख ६२ हजाराची रक्कम मागील अनेक दिवसापासून भरली नव्हती. याच परिसरातील दोन वीज ग्राहकांनी १ लाख २७ हजाराची रक्कम तात्काळ भरली. बिनाकी उपविभाग तर्फे वीजबिल वसुली तसेच विज चोरी पकडण्याची मोहिम राबविण्यात आली. सदर मोहीम ठक्करगाम ,नाईक तलाव, बंगाली पंन्जा या भागांमध्ये पोलीस बंदोबस्त घेऊन राबविण्यात आली. मोहिमेमध्ये एकूण ११ ग्राहकांकडे रुपये ८ लाख ५८ हजार रुपयांची थकबाकी होती. दरम्यान एकूण ३ ग्राहकांनी रुपये ६५ हजार रुपयांचा त्वरित भरणा केला. तसेच विदुयत कायदा कलम १३५ अंतर्गत कायम स्वरूपीवीज पुरवठा खंडित असलेल्या २४ वीज ग्राहकांची वीज चोरी पकडण्यात आली.


महावितरणचे नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभीयंता दिलीप दोडके,अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता समीर टेकाडे, उपकार्यकारी अभियंता मुकेश चौधरी, प्रशांत भाजीपाले सहाय्यक अभीयंता प्रशांत इंगळे,अल्पेश चव्हाण, तुषार मेंढे यांनी कारवाई पार पाडली.कारवाई दरम्यान पुरेसा पोलिस बंदोबस्त घेण्यात आला होता. यानंतरही थकबाकी असलेल्या ग्राहकांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे.

पुन्हा शिवीगाळ
बेसा वितरण केंद्र येथील सहायक अभियंता विनोद नासरे आपल्या सहकाऱ्यांसह अथर्व हेरिटेज येथे वीज बिल वसुली करिता आतीश पटेल यांचे कडे गेले असता त्यांनी मागील ३ महिन्या पासून सुमारे पावणे सहा हजार रुपयांचे बिल भरले नव्हते. पटेल यांनी देयकाची रक्कम भरण्यास नकार दिल्याने महावितरणकडून वीज पुरवठा खंडित केला. या नंतर आतीश पटेल यांनी महावितरण पथकाला शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली. सहायक अभियंता नासरे आणि कनिष्ठ तंत्रज्ञ श्रीमती लांडे यांचा मोबाईल हिसकला, सदर बाबत पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे फिर्याद नोंदविण्यात आली आरोपी वर कलम १८६, ५०४, ५०६,३२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.