सत्तेचा दुरुपयोग करीत आहे मविआ सरकार
नागपूर: पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जे अभद्र व्यक्तव्य केले, त्यावेळी त्यांच्या अवतीभवती 400 लोकांचा जमाव होता. पण नियमाचे उल्लंघन झाले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता माझ्यावर गुन्हा दाखल होतो. याचा अर्थ हे सरकार सत्तेचा दुरुपयोग करीत असून पोलिस खातेही सरकारच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला.
पंतप्रधानांबाबत पटोले यांनी जे वक्तव्य केले ते लहान पोरालाही ऐकविले तरी ते वक्तव्य पंतप्रधान मोदींबद्दल आहे, असे तो म्हणेल. सतत खोटे बोलणे आणि फसवणूक करणे हा नानांचा स्वभाव आहे. म्हणून मी त्यांना मि. नटवरलाल म्हणणार आहे.
जो गावगुंड म्हणून पटोले यांनी पत्रकारांसमोर आणला तो मुद्दाम आणण्यात आला. उमेश घरडे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात 3 वर्षात एकही गुन्हा पोलिसांकडे दाखल नाही, तर तो गावगुंड कसा? त्याला जबरीने आणले व त्याच्याकडून काही गोष्टी वदवून घेण्यात आल्या. पत्रकारांच्या प्रश्नांनाही तो उत्तरे देऊ शकला नाही म्हणून त्याने पळ काढला, याकडेही आ. बावनकुळे यांनी लक्ष वेधले.
काँग्रेस पक्षाात आतापर्यंत अनेक प्रदेशाध्यक्ष होऊन गेले. पण नाना पटोले या अध्यक्षांनी काँग्रेसची पत खराब केली. पटोले ज्यांना कधीही मारू शकतात, शिव्या घालू शकतात, असा व्यक्ती त्यांच्या समर्थनार्थ कसा समोर येऊ शकतो? त्यांचे वागणे दुर्भाग्यपूर्ण आहे. काँग्रेसला हे कळले पाहिजे. असे असले तरी पटोले यांना आम्ही सोडणार नाही. न्यायालयात दाद मागून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यांनी पंतप्रधानांचा अपमान केला, असेही आ. बावनकुळे म्हणाले.

