अफवा पासून सावध राहण्याचे महा मेट्रो, नागपूरचे आव्हान
नागपूर: महा मेट्रोत नोकरी लावून देणार या भूल थापा देत फसवणुकीचे प्रकार नागपुरात होत असल्याचे चित्र असल्याने या प्रकारांपासून सर्व सामान्य नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन महा मेट्रो तर्फे करण्यात येत आहे. मेट्रो तर्फे पदभरती होत असतांना त्या संबंधीची सर्व माहिती महा मेट्रोची वेबसाईट www.mahametro.org व प्रतिष्ठित वर्तमान पत्रांमध्ये प्रकाशित केल्या जाते.
त्यामुळे पदभरती संबंधी कुठलीही माहिती मिळाल्यास याची संपूर्ण शहानिशा महा मेट्रोची ऑफीशीयल वेबसाईट (संकेत स्थळ) किंवा मेट्रो भवन कार्यालयातून करावी तसेच टोल फ्री क्रमांक : १८००२७००५५७ वर संपर्क साधावा. असे आव्हान महा मेट्रो, नागपूर तर्फे नागरिकांना केले जात आहे. तसेच कुठल्याही त्रयस्थ व्यक्तीच्या मार्फत महा मेट्रोची पदभरती होत नाही याची देखील सर्वांनी नोंद घ्यावी.
मेट्रोत नोकरी लावून देतो असे म्हणत फसवणुकीचे प्रकार या आधी नागपुरात घडले असून त्या प्रकरणात पोलीस तक्रार देखील झाली आहे. नोकरी देण्यासंबंधीचे कुठलेही अधिकार महा मेट्रोने कुठल्याही त्रयस्थाला दिले नसून कुणी तसा दावा करत असेल तर ते सपशेल चुकीचे असल्याची खात्री सर्वांनी बाळगावी. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करत सर्व सामान्य नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी अश्या भूलथापांना किंवा अफवांना बळी पडू नये हे आवाहन महा मेट्रो तर्फे केले जात आहे.

