Published On : Fri, Apr 9th, 2021

रविवारी होणारी MPSC पूर्व परीक्षा लांबणीवर; करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

MPSC

MPSC Exam 2021 Postponed: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (MPSC) येत्या रविवारी ११ एप्रिल रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नवी तारीख आयोगामार्फत लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा येत्या रविवारी होणार होती. ती तूर्त स्थगित करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात तातडीने बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला आहे.

या परीक्षेसाठी ४२ हजार ७०० उमेदवारांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्रात १०९ उपकेंद्रांवर परीक्षा होणार होती. प्रशासनाने यासंदर्भातील तयारीही केली होती, मात्र राज्यातील करोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. सरकारी यंत्रणेवरही यामुळे ताण होता. त्यामुळे ही परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी होत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीत ही परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची संयुक्त पुर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.

राज्यातील करोना स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेच्या तारखा एमपीएससी मार्फत नव्याने घोषित केल्या जातील असे ही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि विद्यार्थी आणि विविध राजकीय पक्षांचे यासंदर्भातील मत आणि मागण्या विचारात घेऊन हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. ही परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही तसेच परीक्षा फॉर्म भरतांनाचे विद्यार्थ्यांचे वय गृहित धरले जाणार असल्याने वयाची ही अडचण येणार नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार, विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह आयोगाचे प्रभारी सचिव संघ तवरेज आदी मान्यवर उपस्थित होते.


बैठकीत उपस्थितांना राज्यातील करोनास्थिती आणि करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यसचिवांनी दिली. बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपस्थित सर्व मंत्री आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्याशी साकल्याने चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. बैठकीत करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही परीक्षा पुढे ढकलावी अशी विद्यार्थ्यांचीही मागणी असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही परीक्षा पुढे ढकलावी, उमेदवारांमध्ये करोना संसर्गाची भीती आहे, अशी विनंती आव्हाड यांनी सरकारकडे केली होती. राज्यातील अंशत: लॉकडाऊन स्थितीमुळे अनेक अभ्यासिकाही बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे उमेदवारांकडूनही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत होती. काही दिवसांपूर्वी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली जाऊ नये या मागणीसाठी उमेदवारांनी मोठे आंदोलन केले होते. मात्र तेव्हाच्या करोना संसर्ग स्थितीहूनही राज्यातील सध्याची स्थिती बिकट असल्यानेच ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज ठाकरेंची विनंती
दरम्यान, राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना फोन केला होता. त्यावेळी फोनवर राज यांनी MPSC ची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात चर्चा केली.