Published On : Fri, May 27th, 2022

खासदार क्रीडा महोत्सवचा समारोप शनिवारी

Advertisement

कपिल देव यांची विशेष उपस्थिती, अरमान मलिक यांचे लाईव्ह कॉन्सर्ट

नागपूर. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून २०१८ पासून प्रतीवर्षी नियमित सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचे यावर्षीचे चवथे पर्व आता समारोपाला येऊन पोहचले आहे. थाटात झालेल्या उद्घाटनीय सोहळ्याप्रमाणेच समारोपीय कार्यक्रम सुद्धा तेवढ्याच दिमाखदार होणार आहे. शनिवारी २८ मे २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता यशवंत स्टेडियम येथे खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती खासदार क्रीडा महोत्सव समितीचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विवेकानंद नगर येथील स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ नागपूरच्या सभागृहात शुक्रवारी (ता.२७) झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. संदीप जोशी यांच्यासह श्री. पीयूष आंबूलकर, श्री. आशिष मुकीम, डॉ. पद्माकर चारमोडे आदी उपस्थित होते.

भारतीय संगीत क्षेत्रातील लाडके कलाकार अरमान मलिक यांच्या लाईव्ह म्युझीकल कार्यक्रमाने समारोपीय सोहळा अधिक रंगतदार होणार आहे. संपूर्ण कार्यक्रमासाठी प्रवेश नि:शुल्क असून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रवेशिकांचे वितरण सुरू झालेले आहे.

केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या महोत्सवाच्या समारोप सोहळ्याकरिता प्रख्यात भारतीय क्रिकेटपटू व १९८३ मधील विश्व चषक विजेत्या भारतीय संघाचे कर्णधार श्री. कपिल देव यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. समारोपीय कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री श्री. सुनील केदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस, आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे, ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे एक्सिक्युटिव्ह डायरेक्ट श्री. डी. एस. किम, जेसीबी इंडिया लिमिटेडचे असोसिएट व्हॉईस प्रेसिडेंट जसमीत सिंग यांची उपस्थिती असेल.

प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार श्री. प्रवीण दटके, आमदार श्री. नागो गाणार, आमदार श्री. कृष्णा खोपडे, आमदार श्री. विकास कुंभारे, आमदार श्री. मोहन मते, आमदार श्री. समीर मेघे, आमदार श्री. टेकचंद सावरकर यांची उपस्थिती असेल. खासदार क्रीडा महोत्सवाच्या चवथ्या सत्रात घेण्यात आलेल्या सर्व खेळांचे अध्यक्ष आणि सचिव यांची कार्यक्रामाला प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.

खासदार क्रीडा महोत्सवाचा दिमाखदार समारोपीय सोहळा शनिवारी २८ मे रोजी सायंकाळी ठिक ५.३० वाजता सुरू होणार आहे. कार्यक्रमाला शहरातील खेळाडू, क्रीडाप्रेमी, नागरिकांनी वेळेत उपस्थित रहावे, असेही आवाहन श्री. संदीप जोशी यांनी केले.

श्री. बबनराव तायवाडे यांना यंदाचा ‘क्रीडा महर्षी’ पुरस्कार
क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वाला खासदार क्रीडा महोत्सव समितीतर्फे दरवर्षी ‘क्रीडा महर्षी’ पुरस्काराने गौरविण्यात येते़. महोत्सवाचे हे चवथे वर्ष असून समितीच्या निर्णयानुसार या वर्षीचा ‘क्रीडा महर्षी’ पुरस्कार श्री. बबनराव तायवाडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या पहिल्या वर्षी श्री. सरदार अटल बहादूर सिंग, दुसऱ्या क्रीडा महोत्सवात श्री. शशांक मनोहर, तिसऱ्या क्रीडा महोत्सवात श्री. भाऊ काणे यांना ‘क्रीडा महर्षी’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

खेळाडूंना क्रीडा भूषण पुरस्कार
क्रीडा क्षेत्रात आपल्या कामगिरीने छाप सोडणाऱ्या खेळाडूंना ‘क्रीडा भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येकी २५ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि खेलो इंडिया खेलो स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ‘क्रीडा भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. विविध क्रीडा प्रकारानुसार खेळाडूंची या पुरस्कारासाठी समितीतर्फे निवड करण्यात आली आहे. पुरस्कारासाठी खालील खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे.

संजना जोशी (सायकलिंग), शादाब पठाण (ऍथेलेटिक्स), स्टॅनली पीटर (फुटबॉल), अनूप मस्के (बास्केटबॉल), ईशिका वरवडे (बॉक्सिंग), प्रवीण धांडे (तायक्वांडो), प्रेरणा यादव (रायफल शूटिंग), दीपाली सबाने (खो-खो), सेजल भुतडा (लॉन टेनिस), दिव्या देशमुख (बुद्धिबळ), रिशिका बडोले (जलतरण), संदीप गवई (तिरंदाजी), रितिका ठक्कर (बॅडमिंटन), वैभव श्रीरामे (योगासन), केतकी गोरे (ज्यूडो), ऋषभ जोद्देवार (सॉफ्टबॉल), जेनिफर वर्गीस (टेबल टेनिस), हिमांशी गावंडे (हॉकी), शशांक वानखेडे (कबड्डी), अभिषेक ठावरे (दिव्यांग स्पर्धा), सौरभ रोकडे (व्हॉलीबॉल), दामिनी रंभाड (तलवारबाजी), इरशाद सागर (सेपक टॅकरा) पूनम कडव (हँडबॉल), अल्फीया शेख (पॉवर लिफ्टिंग).

क्रीडा संघटनेला ‘बेस्ट कोऑपरेशन अवार्ड’
खासदार क्रीडा महोत्सवामध्ये क्रीडा संघटनांचे मोलाचे सहकार्य असते. खासदार क्रीडा महोत्सवतर्फे दरवर्षी एका क्रीडा संघटनेला ‘बेस्ट कोऑपरेशन अवार्ड’ प्रदान करण्यात येतो. रुपये १ लक्ष रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावर्षी ‘द नागपूर डिस्ट्रीक्ट हार्डकोअर टेनिस असोसिशन’ या क्रीडा संघटनेला ‘बेस्ट कोऑपरेशन अवार्ड’ देण्याचे समितीद्वारे निश्चित करण्यात आले आहे.

प्रवेशिकांसाठी येथे संपर्क साधा
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रवेशिका आवश्यक आहेत. प्रवेशिका मिळविण्यासाठी यशवंत स्टेडियम, माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान कार्यालय, रेशिमबाग, गिरनार बँक सुभाष पुतळा लकडगंज, ग्लोकल स्केअर मॉल अभ्यंकर नगर (हल्दिराम समोर सीताबर्डी), इनडोअर स्टेडियम विवेकानंद नगर, राम जीवन चौधरी क्रीडा संकुल राम कुलर चौक, रेमण्ड शॉप सक्करदरा चौक या ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क साधावे.