Published On : Mon, Dec 10th, 2018

मौदा नगर पंचायत भाजपाकडे

नागपूर (मौदा): अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या मौदा नगर पंचायतीचा निवडणुकीचे निकाल लागले असून या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष व 8 नगरसेवक निवडून आले असून भाजपाने ही नगर पंचायत आपल्याकडे राखली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामांवर मतदारांनी विश्वास दाखविला आहे. या निवडणुकीत काँग्रेस दुसर्‍या क्रमांकावर तर शिवसेना तिसर्‍या क्रमांकावर गेली आहे. राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही.

अध्यक्षपदासाठी भाजपाच्या भारती सोमनाथे या निवडून आल्या आहेत. त्यांना 2573 मते मिळाली असून काँग्रेसच्या रोशनी निनावे या दुसर्‍या क्रमांकावर आहेत. त्यांना 2445 मते मिळाली आहेत. शिवसेनेच्या रंजना धनजोडे या तिसर्‍या क्रमांकावर गेल्या आहेत. राष्ट्रवादीच्या पुष्पा गभने या चवथ्या क्रमांकावर आहेत.

वॉर्ड 2 मधून भाजपाचे जॉनी चलसानी हे विजयी झाले आहेत. वॉर्ड 6 मधून विमल पोटभरे, वॉर्ड 8 मधून भाजपाच्या सुनीता पाराशर, वॉर्ड 11 मधून भाजपाच्या सुषमा कुंभलकर, वॉर्ड 12 मध्ये सुनील रोडे, वॉर्ड 13 मध्ये देविदास कुंभलकर, वॉर्ड 16 मध्ये राकेश धुर्वे आणि वॉर्ड 17 मध्ये शालिनी कुहीकर (सर्व भाजपा) निवडून आल्या आहेत.

या निवडणुकीत भाजपाचे 8 नगरसेवक, काँग्रेसचे 5, शिवसेनेचे 2 तर अपक्षांचे 2 नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही. राष्ट्रवादीचे पूर्णत: पानीपत या निवडणुकीत झाले.

या निवडणुकीत भाजपाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावे यासाठी पालकमंत्र्यांनी आपली शक्ती पणाला लावली होती. पालकमंत्री मौदा भागात तळ ठोकून बसले होते. अनेक बैठकी घेतल्या आणि प्रत्यक्ष मतदारांशी घरोघरी जाऊन संपर्क केला. याशिवाय मौदा शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधीचा विकास निधी पालकमंत्र्यांनी या भागासाठी खेचून आणला. या कामांवरच मतदारांनी शिक्कामोर्तब करीत कमळावर विश्वास दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्र्यांवर मतदारांचा विश्वास : पालकमंत्री बावनकुळे
मौदा नगर पंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पक्षाला बहुमत देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखविला आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. मी मौद्याचे जनतेचे आभार मानतो, असे सांगून पालकमंत्री बावनकुळे म्हणाले- पालकमंत्री म्हणून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

मौदा शहर आणि जिल्ह्यात विकास कामे केली. अनेक कामे अजून पूर्ण व्हायची आहे. ती कामेही पूर्ण करणार. मतदारांनी भाजपाला मते देऊन जे कर्ज दिले आहे, त्या कर्जाची परतफेड करणे माझे कर्तव्य आहे, असेही बावनकुळे म्हणाले.