Published On : Tue, Jan 15th, 2019

महा मेट्रो आणि नागपूर महानगर पालिका दरम्यान सामंजस्य करार

Advertisement

महा मेट्रो आणि महानगरपालिका करणार कॉटन मार्केट नेताजी मार्केट व गड्डीगोदाम मार्केटचा संयुक्त विकास

नागपूर : निर्धारित वेळेत महा मेट्रो नागपूर प्रकल्पाचे कार्य पूर्ण होत असल्याने आता महा मेट्रोकडे शहरातील इतर विकासकामांची जबाबदारी देखील सोपविण्यात आली आहे. आज मंगळवार, दिनांक १५ जानेवारी रोजी महाल स्थित टाऊन हॉल येथील सभागृहामध्ये केंद्रीय परिवहन श्री. मंत्री नितीन गडकरी अध्यक्षतेमध्ये घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत महा मेट्रो आणि नागपूर महानगर पालिका दरम्यान सामंजस्य करारावर महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित आणि महानगर पालिकेचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी हस्ताक्षर केले.

या बैठकीत शहरातील व्यावसायिक जागेचा महा मेट्रो पुनःविकास करणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. महा मेट्रो आणि महानगर पालिकेच्या सयुक्त सामंजस्य करार अंतर्गत कॉटन मार्केटसह खोआ मार्केट व संत्रा मार्केट, बर्डी येथील नेताजी फुल मार्केट आणि गड्डीगोदाम स्थित गोलबाजार या जागेच्या पुनःविकास कामाची जबाबदारी महा मेट्रोला देण्यात आली आहे. या आढावा बैठकीत महापौर श्रीमती. नंदा जिचकार, विभागीय आयुक्त श्री. संजीव कुमार,जिल्हाधिकारी श्री. श्री. अश्विन मुद्द्गल, आमदार श्री. कृष्णा खोपडे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार श्री. विकास कुंभारे, आमदार श्री. नागो गाणार, सभापती,लघु उद्योग विकास महामंडळ श्री. संदीप जोशी,महा मेट्रोचे महाव्यवस्थापक(प्रशासन) श्री. अनिल कोकाटे तसेच महा मेट्रो व मनपाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

१९०१ साली उभारण्यात आलेल्या कॉटन मार्केट इमारतीचे ३०,००० रुपये खर्च करून १९२८ साली पुनःबांधकाम करण्यात आलेले होते. त्यानंतर १९६९ साली साली पुनःबांधकाम झालेल्या सध्याच्या कॉटन मार्केटसाठी सुमारे ७०,४२४.६३ चौरस मीटर, नेताजी मार्केटसाठी ७,३९३ .४० चौरस मीटर व १९३१ साली उभारण्यात आलेल्या गड्डीगोदाम स्थित गोलबाजारसाठी ६,२८९.९० चौरस मीटर इतक्या जागेवर व्यावसायिक प्रगतीसाठी विविध विकास कामे महा मेट्रो करणार आहे. करारानुसार इमारतीचा विस्तारित आराखडा, इमारत बांधकामाची योजना, वित्तीय योजना, दुकानांचे बांधकाम व इतर संबंधित सर्व कामाची जबाबदारी महा मेट्रोला देण्यात आली आहे. या सर्व कार्यासाठी संबंधित जागा अटी व शर्तीवर महा मेट्रोला हस्तांतरीत करण्यात आली आहे. या जागेचे सामित्व महानगरपालिके कडे असेल व विकास कार्य पूर्ण होताच महा मेट्रो महानगरपालिकेला हस्तांतरित करेल.

यापूर्वी महा मेट्रो आणि मनपा मध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार जगातील प्रसिद्ध ‘लंडन स्ट्रीट’च्या धर्तीवर शहरात तयार होणाऱ्या ‘ऑरेंज सिटी स्ट्रीट’च्या प्रस्तावित जागेवर महा मेट्रो आकर्षक मेट्रो मॉल तयार करणार आहे. या कार्याची संपूर्ण रूपरेखा तयार होण्याच्या पूर्वीच आता तीन अतिरिक्त महत्वाच्या कार्याची जबाबदारी देखील महा मेट्रोला देण्यात आली आहे. हे सर्व कार्य निर्धारित वेळेत महा मेट्रो पूर्ण करणार असल्याचा विश्वास महा मेट्रोच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला.