
बीड : मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आई कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करू शकते, याचा प्रत्यय बीड जिल्ह्यातील रमाबाई रणवीर यांच्या जिद्दीने दिला आहे. वयाच्या ४७व्या वर्षी मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी चक्क अनवाणी पायांनी मॅरेथॉन धावत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या जिद्दीचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून, नेटकऱ्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अंबाजोगाई येथे राहणाऱ्या रमाबाई रणवीर यांच्यावर पतीच्या निधनानंतर दोन मुलींच्या संगोपनाची जबाबदारी आली. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही त्यांनी मुलींच्या शिक्षणात कोणतीही कमतरता पडू नये, असा निर्धार केला. यासाठी त्या एका अकादमीत स्वयंपाकाचे काम करतात.
दरम्यान, एका स्थानिक संस्थेने आयोजित केलेल्या ‘अमृत दौड’ मॅरेथॉनमध्ये प्रथम क्रमांकासाठी तीन हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. मुलींच्या पुस्तकांसाठी पैसे मिळवण्याच्या उद्देशाने रमाबाईंनी या स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे, इतर तरुण स्पर्धक क्रीडावेशात सहभागी झाले असताना रमाबाई नेहमीच्या साडीतच धावण्यासाठी उतरल्या. सुरुवातीला पायातील चप्पल धावताना अडथळा ठरू लागली. अखेर त्यांनी चप्पल हातात घेतली आणि अनवाणीच धावण्यास सुरुवात केली. रस्त्यावरील दगड पायांना टोचत असतानाही त्यांनी धावणे थांबवले नाही. साडी सावरत, वेदना सहन करत त्यांनी अखेर इतर सर्व स्पर्धकांना मागे टाकले आणि मॅरेथॉनचा पहिला क्रमांक पटकावला.
विजयानंतर रमाबाईंनी सांगितले की, धावताना त्यांच्या डोळ्यांसमोर केवळ मुलींचे भविष्य होते. मिळालेल्या तीन हजार रुपयांतून मुलींसाठी पुस्तके घेण्याचा त्यांचा मानस होता.
विशेष म्हणजे, रमाबाईंची मुलगी पुजाही या स्पर्धेत सहभागी झाली आणि तिने दुसरा क्रमांक मिळवला. पुजा सध्या पोलिस भरतीची तयारी करत असून पोलिस अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे. तिची बहीण बँकिंग परीक्षेची तयारी करत आहे.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पूर्वी शेतीवर अवलंबून होती. मात्र मुलींची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रमाबाईंनी अकादमीत स्वयंपाकाचे काम स्वीकारले. पुजाची मेहनत आणि परिस्थिती लक्षात घेऊन अकादमीच्या संचालकांनी तिची शैक्षणिक शुल्कमाफीही केली.
रमाबाईंचा हा विजय केवळ मॅरेथॉनमधील विजय नसून, आईच्या त्यागाची, संघर्षाची आणि मुलींच्या स्वप्नांसाठीच्या अढळ जिद्दीची प्रेरणादायी कहाणी ठरली आहे.




