नागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर परिसरात असलेल्या ‘द बॅरल कॅफे’मध्ये आग लावल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. रजनीगंधाची पुडी पबमध्ये नेण्यास सुरक्षा कर्मचाऱ्याने विरोध केल्याने झालेली किरकोळ बाचाबाची एका मास्टर शेफच्या मनात घर करून राहिली. मित्रांसमोर झालेल्या कथित अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने साथीदाराच्या मदतीने पब बंद झाल्यानंतर पेट्रोल ओतून आग लावल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी इसासनी येथील भीमनगर परिसरातील ३१ वर्षीय मोहनलाल तिवारी आणि मध्य प्रदेशातील रीवा येथील २३ वर्षीय शुभम विश्वकर्मा यांना अटक केली आहे. मोहनलाल हा व्यवसायाने मास्टर शेफ असून त्याने परदेशातील सुमारे दहा देशांमध्ये काम केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या तो जयप्रकाशनगर परिसरात स्वतःचे हॉटेल चालवतो. तर शुभम हा नागपुरातील एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करतो.
मित्रांसमोर झालेला वाद मनात ठेवला
शनिवारी रात्री मोहनलाल आपल्या तीन मित्रांसह द बॅरल कॅफेमध्ये गेला होता. प्रवेशावेळी सुरक्षा कर्मचाऱ्याने त्याच्याकडील रजनीगंधाची पुडी आत नेण्यास मनाई केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. मित्रांसमोर झालेल्या या प्रकारामुळे मोहनलाल नाराज झाला. पार्टी संपल्यानंतर तो घरी गेला; मात्र त्याच्या मनात बदला घेण्याचा विचार सुरू होता.
यानंतर त्याने मित्र शुभमला फोन करून बाहेर फिरण्यासाठी बोलावले. शुभमला त्याच्या मनसुब्याची कल्पना नसल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री दोघे पुन्हा द बॅरल कॅफेजवळ पोहोचले. पब बंद झाल्यानंतर त्यांनी तेथे पेट्रोल ओतून आग लावली आणि घटनास्थळावरून पसार झाले.
सीसीटीव्हीने उघड केला प्रकार
आगजनीच्या घटनेत कॅफेचे सुमारे ९ लाख रुपयांचे नुकसान झाले. कॅफेचे मालक हरीश गवई यांच्या वतीने व्यवस्थापक कमलदीप मित्रे यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रण तपासले असता दोन्ही आरोपी कॅफेमध्ये प्रवेश करताना आणि पेट्रोल ओतून आग लावताना दिसून आले.
सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन्ही आरोपींना अटक केली. किरकोळ वादातून सुरू झालेला प्रकार थेट सुमारे ९ लाख रुपयांच्या आगजनीपर्यंत पोहोचला. या प्रकरणाचा पुढील तपास अंबाझरी पोलीस करत आहेत.





