
नागपूर : काँग्रेसकडून ऑफर मिळाल्याच्या चर्चांवर शिंदेसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी स्पष्टीकरण देत या चर्चांना फारसे महत्त्व नसल्याचे स्पष्ट केले. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, आपल्याला नेमकी कधी आणि कोणाकडून अशी ऑफर देण्यात आली, याची आपल्याला माहिती नाही.
काँग्रेसचे नेते मुकुंद साकरकर यांच्याबाबत बोलताना भोंडेकर म्हणाले की, साकरकर हे चांगले व्यक्ती आहेत. त्यांनी कदाचित प्रेमापोटी किंवा विनोदाच्या स्वरूपात अशी टिप्पणी केली असावी. मात्र, सध्याचा काळ राजकीय ऑफर स्वीकारण्याचा किंवा त्यावर चर्चा करण्याचा नसून जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देण्याचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
भंडारा जिल्ह्यात रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासोबतच नवीन प्रकल्प पूर्ण करण्यावर आपला भर असल्याचे भोंडेकर यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला बळ देत जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
धान खरेदीच्या प्रश्नावरही भाष्य-
गोंदिया जिल्ह्यातील धान खरेदी आणि दराच्या मुद्द्यावरही आमदार भोंडेकर यांनी भूमिका मांडली. महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील धान खरेदीची परिस्थिती तसेच शेतकऱ्यांना मिळणारे दर आणि पेमेंट यांचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल शासनाकडे सादर केला असून, त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शिवसेना-भाजपमधील वादावर पडदा?
शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या नाराजीच्या चर्चांवरही भोंडेकर यांनी भाष्य केले. दोन्ही पक्षांमध्ये नाराजी नसल्याचे सांगत त्यांनी सोशल मीडियावरील वाद थांबवण्याचा निर्णय दोन्ही जिल्हाप्रमुखांनी घेतल्याचे स्पष्ट केले.
एका बाजूने या विषयाला सुरुवात झाल्यानंतर आमच्याकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र, आता हा विषय पुढे नेण्याची गरज नसून तो इथेच थांबवण्यात आला आहे, असे भोंडेकर यांनी सांगितले.
रोहित पवारांच्या दौऱ्याचे स्वागत-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांच्या गोंदिया दौऱ्याबाबत बोलताना भोंडेकर यांनी त्यांच्या दौऱ्याचे स्वागत केले. प्रत्येक नेता आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी दौरे करत असतो आणि त्यांनी ग्रामीण व दुर्गम भागात पोहोचले पाहिजे, असे ते म्हणाले.
पूर्वी राजकीय नेत्यांचे दौरे प्रामुख्याने पुणे, सांगली आणि सातारा यांसारख्या भागांपुरते मर्यादित असल्याचे चित्र होते. मात्र, आता विदर्भातील दुर्गम जिल्ह्यांकडेही नेत्यांचे लक्ष जात असेल आणि त्याचा फायदा स्थानिक विकासाला होत असेल, तर त्याचे स्वागतच केले पाहिजे, अशी भूमिका नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केली.




