Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Apr 17th, 2018

  प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून देशात चार वर्षात दीड लाखाहून अधिक किमी लांबीचे रस्ते

  नवी दिल्ली : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून देशात गेल्या चार वर्षात १ लाख ७० हजार ७०० किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले आहेत. महाराष्ट्रात या योजनेतून ३९९० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे.

  देशातील ग्रामीण भागात रस्ते बांधणीसाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना हा कार्यक्रम सन २००० यावर्षी सुरू करण्यात आला. ग्रामीण भागात दळणवळण सुविधा निर्माण करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला.

  देशातील ४४ हजार वस्त्यांपर्यंत रस्ते
  प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून गेल्या चार वर्षात देशात चार वर्षात १ लाख ७० हजार ७०० किमी लांबीचे रस्ते तयार करण्यात आले, या रस्त्यांमुळे देशातील ४४ हजार ४८२ वाड्या-वस्त्यांना दळण-वळणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. सन २०१४-१५ या वर्षात देशात उद्दिष्टापेक्षा अधिक लांबीचे रस्ते बांधण्यात आले, या काळात २२ हजार किमी लांबीचे रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट होते,परंतु प्रत्यक्षात ३८ हजार किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले. यामुळे ११ हजार १९० वसाहतींना दळण वळण सुविधा उपलब्ध झाली.

  सन २०१५-१६ यावर्षात ३३ हजार ६५० किमी लांबीचे रस्ते बांधणीचे उद्दिष्ट होते,प्रत्यक्षात ३६,४४९ किमी लांबीचे रस्ते बांधून ९९७३ वसाहतींना दळण वळण सुविधा निर्माण करून देण्यात आली. सन २०१६-१७ या वर्षात ११,७९७ वसाहती पर्यंत दळण वळण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ४७ हजार ४४७ किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले, तर २०१७-१८ यावर्षात ४८ हजार ७५० किमी लांबीचे रस्ते बांधून ११,५२२ वसाहती जोडण्यात आल्या.

  महाराष्ट्रात ३९९० किमी लांबीच्या रस्त्यांचे बांधकाम
  गेल्या चार वर्षात महाराष्ट्रात ४ हजार किमी लांबीचे रस्ते बांधणीचे उद्दिष्ट होते, या तुलनेत राज्यात ३९९० किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले, या रस्त्यांमुळे १६३ वसाहतींना दळणवळण सुविधा उपलब्ध झाली आहे. सन २०१४-१५ यावर्षात महाराष्ट्रात ५२८ किमी लांबीचे रस्ते तयार करण्यात आले व यामुळे ५६ वसाहती जोडल्या गेल्या. २०१५-१६ यावर्षात ५१ वसाहतींना दळणवळण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ८९१ किमी लांबीचे रस्ते बांधकाम करण्यात आले. सन २०१६-१७ यावर्षात १९०० किमी लांबीचे रस्ते बांधणीचे उद्दीष्ट होते, परंतु प्रत्यक्षात २००० किमी लांबीचे रस्ते तयार करून २४ वसाहती जोडण्यात आल्या, तर २०१७-१८ या वर्षात ३२ वसाहती रस्त्यांशी जोडण्यात आल्या, यासाठी ५७० किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले. सन २०१८-१९ या चालू वर्षासाठी ग्राम सडक योजनेतून राज्यात ५०० किमी लांबीचे रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट केंद्र शासनाने ठेवले आहे.

  दहा वर्षात ४ लाख किमी लांबीचे रस्ते
  देशात सन २००८ पासून ते आजपर्यंत ४ लाख ९ हजार किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले. या दहा वर्षात ९८ हजार वसाहती रस्त्यांद्वारे जोडण्यात आल्या, तर गेल्या चार वर्षात ४४,४८२ वस्त्या जोडण्यासाठी १ लाख ७० हजार ७०० किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले. या चार वर्षात दररोज सरासरी ११६ किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145