नागपूर : गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसाने अनेक राज्यांना झोडपून काढले असले, तरी आता हवामानविषयक एक दिलासादायक घडामोड समोर आली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी पावसाने अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे लवकरच संपूर्ण देशात पावसाळा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
अंदमानात मान्सूनची एन्ट्री-
गेल्या २४ तासांमध्ये अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. बंगालच्या उपसागरातील उत्तरेकडील भाग, अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. पुढील काही दिवसांत मान्सून अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि दक्षिण बंगालच्या उपसागरातही सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
महाराष्ट्रात मान्सून केव्हा?
राज्यात हलक्याफुलक्या सरींची हजेरी लागलेली असली तरी खऱ्या अर्थाने मान्सून ६ जूनच्या आसपास महाराष्ट्रात पोहोचणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याआधी, म्हणजेच २७ मेच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसाने राज्यात नुकसान-
राज्यात अनेक भागांत वळवाच्या सरी कोसळत आहेत. मात्र यामुळे काही ठिकाणी शेतीसह जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात सुमारे १४ हजार शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वादळी वारे आणि वीज पडल्याने अपघात-
लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यांत वीज पडून नऊ जण जखमी झाले असून, एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मनमाडमध्ये वादळी वाऱ्यामुळे विजेच्या ताराही तुटल्या आणि झाड कोसळल्याने इंदूर-पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.
धाराशिव जिल्ह्यातही पावसाचा कहर-
येडशी, येरमाळा, भूम आणि धाराशिव भागात वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात जोरदार अवकाळी पाऊस झाला. उमरगा तालुक्यात बाजाराच्या दिवशी वीज वाहक तारा तुटल्याने तीन जण जखमी झाले आहेत.