महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून यंदा एकूण निकाल 94.10 टक्के इतका आहे.
नेहमीप्रमाणे कोकण विभागाने सर्वोच्च निकाल नोंदवत पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आपलं स्थान कायम ठेवले आहे. कोकणमध्ये 98.82 टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे. त्याचवेळी नागपूर विभागाने सर्वात कमी म्हणजेच 90.78 टक्क्यांची टक्केवारी नोंदवली आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाचा निकाल 1.71 टक्क्यांनी घसरला आहे. विशेष म्हणजे राज्यभरातून 285 विद्यार्थ्यांना अगदी 35 टक्के गुण मिळवून पास होण्याचा काठावरचा टप्पा गाठावा लागला आहे. हे पाहता अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.
यंदाही मुलींनी अधिक चांगले यश मिळवत मुलांपेक्षा आघाडी घेतली आहे. मुलींचा निकाल 96.14 टक्के तर मुलांचा निकाल 92.31 टक्के इतका लागला आहे. त्याचबरोबर 35 टक्के गुण घेणाऱ्यांमध्ये मुलांची संख्या अधिक असल्याचं दिसून येतं.
राज्यात यंदा एकूण 211 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवत उज्वल यश संपादन केलं आहे. विशेषतः लातूर विभागातील 113 विद्यार्थ्यांनी हे यश मिळवलं असून त्यामुळे ‘लातूर पॅटर्न’ पुन्हा चर्चेत आला आहे. याशिवाय 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी 4 लाखांहून अधिक आहेत.
दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील नऊ विभागांतील एकूण 15,58,020 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी 15,46,579 विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली आणि त्यामध्ये 14,55,433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
फक्त 35 टक्के मिळवून पास झालेल्या विद्यार्थ्यांची विभागनिहाय आकडेवारी:
पुणे – 59
नागपूर – 63
छत्रपती संभाजीनगर – 26
मुंबई – 67
कोल्हापूर – 13
अमरावती – 28
नाशिक – 9
लातूर – 18
कोकण – 0
100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे विभागनिहाय वितरण:
पुणे – 13
नागपूर – 3
संभाजीनगर – 40
मुंबई – 8
कोल्हापूर – 12
अमरावती – 11
नाशिक – 2
लातूर – 113
कोकण – 9
राज्यातील सर्वोच्च निकाल: सिंधुदुर्ग – 99.32%
सर्वात कमी निकाल: गडचिरोली – 82.67%