Published On : Wed, Jan 15th, 2020

फूड स्टॉल कँटीनसाठी करणार झोननिहाय जागेची पाहणी

महिला व बालकल्याण समिती सभापतींचा निर्णय : महिला उद्योजिका मेळाव्यावरही चर्चा

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने दहाही झोनमध्ये फूड स्टॉल कँटीन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात जागेच्या उपलब्धतेसाठी झोनस्तरावर सहायक आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले असून त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेसंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी १६ जानेवारी रोजी महिला व बालकल्याण समितीची झोनचा दौरा करणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती संगीता गिऱ्हे यांनी दिली.

नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला सभापती संगीता गिऱ्हे, उपसभापती दिव्या धुरडे, सदस्या विशाखा मोहोड, मंगला खेकरे, मनीषा अतकरे, विरंका भिवगडे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांची उपस्थिती होती.

झोनस्तरावर फूड कँटीन सुरू करण्याचा निर्णय मागील बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार पुढील कार्यवाही तातडीने करण्याच्या दृष्टीने समितीच्या सदस्य १६ जानेवारी रोजी झोनला भेट देऊन जागेसंदर्भात चाचपणी करतील. जागेची निश्चिती झाल्यानंतर पुढील कार्यवाहीला वेग देण्याचे निर्देश सभापती संगीता गिऱ्हे यांनी दिले. १९ ते २६ जानेवारी दरम्यान महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन रेशीमबाग मैदानावर करण्यात येत असून त्याच्या तयारीच्या दृष्टीनेही चर्चा करण्यात आली. आठ दिवस रंगारंग कार्यक्रमांसह महिला बचत गटातील महिलांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची माहिती यावेळी देण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून मनपा मुख्यालय आणि झोन कार्यालयात पाळणाघर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यादृष्टीने करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती समाजकल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली. मात्र, जागेच्या ‌उपलब्धतेसंदर्भात स्थावर विभागाला पाठविण्यात आलेल्या पत्राला अद्याप उत्तर मिळाले नसल्याची माहिती संबंधितांनी दिली. यावर तातडीने स्मरणपत्र पाठविण्याचे निर्देश सभापती संगीता गिऱ्हे यांनी दिले. सन २०१८-१९ आणि २०१९-२० या वर्षांमध्ये महिला व बालकल्याण समिती तसेच समाजकल्याण विभागाद्वारे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेणारा माहितीपट तयार करण्याच्या कामालाही समितीने मंजुरी दिली. बैठकीला समाजकल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.