Published On : Wed, Jan 15th, 2020

चला, चला, प्लास्टिकच्या राक्षसाला हद्दपार करा….!

Advertisement

मम्मी पापा यू टू अभियानांतर्गत पथनाट्य स्पर्धा : स्वच्छतेबाबत केली विद्यार्थ्यांनी जनजागृती

नागपूर, : चला नागरिकांनो, आपणच बनू या आपल्या शहराचे स्वच्छतादूत…शहराचे रस्ते स्वच्छ ठेवा, ओला आणि सुका कचरा विलग स्वरूपात स्वच्छतादूताला द्या, प्लास्टिक हा राक्षस आहे. त्या राक्षसाला हद्दपार करा, असा संदेश देत शहरातील विविध शाळांमध्ये मंगळवारी (ता. १४) विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जनजागृती केली.

नागपूर महानगरपालिका, शालेय शिक्षण विभाग आणि पोलिस वाहतूक विभागाच्या वतीने १३ ते १९ जानेवारीदरम्यान राबविण्यात येत असलेल्या ‘मम्मी पापा यू टू’ अभियानाअंतर्गत मंगळवारी शालेयस्तरावर पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर’ हा स्पर्धेचा विषय होता. यामध्ये शहरातील ४१२ शाळांतील ५८२१ विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रत्येक शाळांतील चमूंनी शहरातील विविध ठिकाणी पथनाट्य करीत ‘मम्मी पापा यू टू’ अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा सकारात्मक संदेश दिला.

विद्यार्थ्यांनी केलेली जनजागृती कौतुकास्पद : महापौर संदीप जोशी
नागपूर शहरातील विविध शाळांमध्ये झालेल्या पथनाट्याला आज महानगरपालिका पदाधिकारी, नगरसेवक तसेच अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. नूतन भारत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी श्रद्धानंद पेठ चौकात पथनाट्य सादर केले. यावेळी महापौर संदीप जोशी, शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांची उपस्थिती होती. यावेळी शाळेतील शिक्षकांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य सर्व पाहुण्यांनी बघून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. ‘मम्मी पापा यू टू’ अभियानाच्या माध्यमातून पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी दिलेला संदेश हा नागपूर शहरातील नागरिकांची मानसिकता बदलविण्यास मदत करेल. विद्यार्थ्यांचे हे कार्य कौतुकास्पद असून तेच खरे या शहराचे स्वच्छतादूत असल्याचे गौरवोद्‌गार त्यांनी काढले. शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे यांनीही यावेळी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत मोठ्यांनीही या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.

१६ जानेवारीला रंगणार वादविवाद स्पर्धा
मम्मी पापा यू टू’ अभियानाच्या माध्यमातून १६ जानेवारीला शाळाशाळांत वादविवाद स्पर्धा रंगणार आहे. ‘शहर स्वच्छता ही फक्त महानगरपालिकेची जबाबदारी आहे’ या विषयांवर ही वादविवाद स्पर्धा होणार आहे. शाळा स्तरावर आयोजित या स्पर्धेतील विजेत्यांची केंद्र स्तरावर स्पर्धा होईल. त्यातून प्रथम तीन आणि दहा उत्कृष्ट विजेत्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येईल. याच दिवशी शाळांमध्ये पालकांसाठी ‘स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर’ या विषयावर रांगोळी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.