पैसा बचतीचे वरदान महिलांनाच : पालकमंत्री बावनकुळे

Advertisement

पारडसिंगा येथे 10 हजार महिलांचा महिला मेळावा
सन्मान, सुरक्षा आणि स्वावलंबन या शासनाने दिले

नागपूर: पैसा बचतीचे वरदान हे महिलांनाच मिळाले आहे. महिलांच्या हातीच तिजोरीची चाबी दिली तर त्या देशाला आणि घरालाही आर्थिकदृष्ट्या मजबूत करू शकतात. म्हणूनच पंतप्रधान मोदी यांनी महिलांसाठ़ी अनेक योजना आणल्या. महिला आर्थिकदृष्ट्या कशा सक्षम होतील याची जाणीव ठेवणारे हे सरकार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

पारडसिंगा येथे भाजपा महिला मेळाव्यात ते संबोधित करीत होते. या मेळाव्याला सुमारे 10 हजार महिला उपस्थित होत्या. व्यासपीठावर भाजपा महिला आघाडी अध्यक्षा माधवी नाईक, प्रदेश महामंत्री अर्चना डेहकर, प्रेरणा बारोकर, मीना तायवाडे, माजी आ. अशोक मानकर, डॉ. प्रतिभा मांडवकर, किशोर रेवतकर, चरणसिंग ठाकूर, उकेश चव्हाण, संदीप सरोदे, वैशाली ठाकूर, मनोज कोरडे, सुधाकर काडे, श्यामराव बारई, योगेश चाफले, भोला सहारे, माया दुरुगकर, जितेंद्र तुपकर आदी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण घराची काळजी करणार्‍या महिलांसाठ़ी विनाव्याजी 1 लाख रुपये कर्जाची योजना आणल्याचे सांगून पालकमंत्री बावनकुळे म्हणाले- महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक योजना राज्य शासनाने राबविल्या आहेत. यातून महिलांना रोजगार उपलब्ध होऊन त्या स्वत:च्या पायावर उभ्या झाल्या. केंद्र आणि राज्य शासनाने महिलांना सन्मान, सुरक्षा आणि स्वावलंबन देण्याचे काम केले.

प्रत्येकाच्या घराचे व्यवस्थापन चालवताना प्रत्येक महिला घरखर्चातून बचत करून आपल्या कुटुंबासाठी पैसा जमा करीत असते, असे सांगून ते म्हणाले- योग्य व्यक्ती निवडला गेला तर सर्व योजना येतील, आपल्या भागाचा विकास होईल मात्र चुकीच्या व्यक्तीची निवड देशाला आणि राज्याला 60 वर्षे मागे नेल्याशिवाय राहणार नाही. 2014 नंतर केंद्र शासनाने या देशातील शेवटच्या गरीब माणसाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक योजना आणल्या. आयुष्यमान योजना, सर्वांसाठी घरे, शेतकर्‍यांसाठ़ी शेतकरी सन्मान योजना, पेन्शन योजना, संजय गांधी निराधार योजनेच्या पैशात वाढ, श्रावणबाळ योजनेच्या निधीत वाढ, उज्ज्वला गॅस योजना अशा अनेक योजना त्यांनी उपस्थित महिलांसमोर सांगितल्या.

याप्रसंगी महिला आघाडी अध्यक्ष माधवी नाईक, माजी आ. अशोक मानकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.