नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात नवजात बाळांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचा घटना उघडकीस आल्या आहेत. गुन्हे शाखेने राज्यात सर्वाधिक गुन्हे दाखल करून ५८ आरोपींना अटक केली. त्यापैकी सर्वाधिक बाळांची विक्री करणाऱ्या आयेशा खान ऊर्फ श्वेता सावळे टोळीवर नागपूर पोलिसांनी ‘मकोका’अंतर्गत कारवाई केली. राज्यातील ही पहिलीच कारवाई असल्याची माहिती आहे.
ज्या दाम्पत्याना मुल नाहीत ते नागपुरात येऊन ८ ते १० लाख रुपयांत नवजात बाळ खरेदी करीत होते. त्यामुळे बाळ तस्करी करणाऱ्या टोळ्या कोट्यवधी रुपये कमवीत असत. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर पाऊले उचलत बाळ तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई केली. ‘एएचटीयू’ पथकाने तपासाचा छडा लावत एकूण ५८ आरोपी शोधून काढले.
त्यात आयेशा खान ऊर्फ श्वेता सावळे ही टोळीची मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. आयेशाने आतापर्यंत जवळपास शंभरावर बाळांची विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या टोळीवर ‘मकोका’अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले.
आयेशा ऊर्फ श्वेता, तिचा पती मकबुल खान, सचिन पाटील, डॉ. नितेश मौर्य, डॉ. रितेश मोटवानी, सलामुल्ला खान, रेखा आप्पासो पुजारी, मुन्नीबाई द्वारकाप्रसाद लिलारे या आरोपींवर मोक्काची कारवाई करण्यात आली.