Published On : Fri, Apr 3rd, 2020

मोदी 5 एप्रिलला देशाला बनविणार एप्रिल फुल

Advertisement

कोरोनाचा मुकाबला करण्याऐवजी मेगा इव्हेंट करणार

घरांमधील सर्व लाईट नऊ मिनिटे बंद करून त्याऐवजी मेणबत्ती किंवा दिवे, टॉर्च लावण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन म्हणजे शुद्ध बालिशपणा आहे. “साठी बुद्धी नाठी” झाल्याचे याचे हे लक्षण आहे, अशी टीका ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केली आहे. 5 एप्रिलला रात्री नऊ वाजता कोणीही घरातील लाईट्स बंद करू नयेत असे आवाहन डॉ. राऊत यांनी केले आहे.

जर एकाच वेळी सगळयांनी विजेचे दिवे व पंखे बंद केले तर ग्रीड हाय फ्रिक्वेन्सीवर ट्रिप होऊन देशातील सर्व वीज निर्मिती केंद्रे बंद पडून अतिशय मोठे नुकसान होईल. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी कित्येक तास लागतील. यामुळे रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण तडफडून मरतील याची मोदिना चिंता नसून ते पुन्हा एखादा मोठी इव्हेंट करण्यासाठी देशाची सुरक्षा धोक्यात घालून आपले मोठेपण सिद्ध करण्याच्या मागे लागले आहेत.

सध्या लॉकडाऊनमुळे वीजेच्या मागणीत घट झाल्याने ग्रीडमध्ये हाय व्होल्टेज असल्याने जर मागणीत पुन्हा घट निर्माण झाली तर देशाचे ग्रीड फेल होण्याचा धोका निर्माण होईल. यामुळे कोरोना सोबत अजून वेगळे संकट या देशात निर्माण होईल अशी भीती डॉ राऊत यांनी व्यक्त केली आहे.

डॉ.राऊत म्हणाले की पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीची ही बाळबोध गोष्ट ऐकून निराशा झाली आहे. आज देशामध्ये कोरोनाचे संकट गंभीर स्वरूप धारण करीत असताना ठोस उपायोजना करण्याचे सोडून पंतप्रधान टाळ्या वाजवा,थाळीनाद करा,लाईट बंद करा, दिवे लावा अशा घोषणा देत सुटले आहेत. यामागे जनतेची दिशाभूल करून कोरोनाच्या धोक्यापासून पळवाट काढण्याचा प्रयत्न करीत आहे, असा घणाघात डॉ राऊत यांनी केला आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकार काय करत आहे? हे जाणून घेण्याचा भारतीय नागरिकांचा हक्क आहे. मात्र देशाला एप्रिल फुल करण्यासाठी मोदींनी जनतेला विजेचे दिवे व पंखे बंद करून 5 एप्रिलला मेणबत्त्या लावायला सांगीतल्या आहे. रोजगार गेल्याने उपाशी मरत असलेल्या जनतेला कँडल लाइट डिनरचे स्वप्न तर मोदी दाखवत नाही ना! असा नागरिकांचा समज होत असल्याचे उपरोधिक वक्तव्य डॉ राऊत यांनी केले.

पंतप्रधान देशातील नागरिकांशी संवाद साधत असताना कोरोनामुळे उपाशीपोटी असलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी काहीतरी बोलतील असे वाटले होते. पण त्यांनी कोरोनाच्या संकटात इव्हेंट चालविला आहे, असा आरोप डॉ राऊत यांनी केला आहे.

मोदी हे देशाचा प्रागतिक व पुरोगामी वारसा मागे नेत आहेत. आज देशाला कधी नव्हे इतकी वैज्ञानिक भूमिकेची गरज असताना “दिवे लावा” यासारखी कामे करण्यास सांगणे म्हणजे प्रतिगामी बनणे असून ही दुर्दैवाची बाब आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

5 एप्रिलला कुणीही आपल्या घरातील दिवे बंद करू नयेत, तसेच या काळात जागरुक राहून कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे /सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन डॉ. राऊत यांनी केले आहे.