Published On : Fri, Apr 3rd, 2020

रेशनकार्ड नसणाऱ्या गरीब व्यक्तींची यादी तयार करा..पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

संचारबंदी नियमांचे काटेकोर पालन व्हावे सोशल डिस्टन्सिंग आवश्यकच लवकरच विभागनिहाय आढावा

‘लॉकडाऊन’च्या काळात अंत्योदय कार्डधारकांना जिल्हा प्रशासनाकडून किराणा वाटप करण्यात येणार असून ज्या मजुरांकडे राशन कार्ड नाही अशा व्यक्तींना सुध्दा किराणा वाटप गरजेचे आहे. अशा व्यक्तींची यादी तयार करुन जिल्हाधिकारऱ्यांकडे तात्काळ पाठविण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना दिले.

उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्याशी आज पालकमंत्री श्री. राऊत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी आमदार राजू पारवे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे उपस्थित होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणात उपाययोजना करीत आहे. अशाच उपाययोजना ग्रामीण भागात होणे गरजेचे असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले. विस्थापित व कामगारांसाठी निवारागृह उभारण्यात आले आहे. याठिकाणी राहण्याची व्यवस्था, जेवन व आरोग्य तपासणी याची दक्षता घेण्यात यावी.निवारागृहात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी आवश्यक आहे.


अंत्योदय कार्डधारकांना किराणावाटप करतांना त्याठिकाणी तक्रारपेटी ठेवून ज्यांच्याकडे कार्ड नाही, अशा व्यक्तींचे अर्ज गोळा करण्यात यावे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, कार्ड नसलेल्या व्यक्तींचे अर्ज गोळा करण्याची जबाबदारी संबंधीत दुकानदारावर सोपविण्यात यावी. कार्ड नसलेल्या व्यक्तींना किराणा देण्यासाठी यादी आवश्यक आहे.

‘होम क्वारंटाईन’ करतांना दक्षता घेण्यात यावी, नागरिकांनी मास्क लावून जावे, तसेच भाजीपाला व किराणा घेतांना ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळण्याकडे कटाक्षाने लक्ष ठेवावे, ‘लॉकडाऊन’च्या काळात नागरिकांना अतिमहत्वाचे काम असल्यास पोलिसांमार्फत पासेस देण्याची व्यवस्था विभागीय अधिकाऱ्यांच्या स्तरावर करण्यात यावी. जेष्ठ नागरिक व महिलांना त्रास होणार नाही याकडे लक्ष द्यावे अशा सूचना डॉ. राऊत यांनी दिल्या.