Published On : Thu, Sep 17th, 2020

कांदा निर्यात बंदी करुन मोदींनी कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर सर्जिकल स्ट्राईक केले – महेश तपासे

– सोनू महाजन या माजी सैनिकाला सरकार निपक्षपणे न्याय मिळवून देणार

मुंबई – केंद्रातील मोदी सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेवून राज्यातील व देशातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर सर्जिकल स्ट्राईक केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला.

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संपूर्ण देशात लॉकडाऊन असताना आता कुठे तरी जागतिक स्तरावर कांद्याची मागणी जोर धरू लागल्यानंतर केंद्रसरकारने कांदा निर्यात बंदी करुन शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज पत्रकार परिषद घेऊन या तुघलकी निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे.

वास्तविक तीन महिन्याआधी EC अँक्टमध्ये काही बदल करून एक निर्णय झाला की, युध्दस्थिती असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल अशा परिस्थितीत EC अँक्टचा वापर करुन काही निर्बंध घालता येतात. आज युध्दस्थिती नाही तरीदेखील अशा पध्दतीची अट घालून जवळपास लाखो शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या उध्वस्त करण्याचे धोरण मोदी सरकारने घेतले आहे असा थेट आरोप महेश तपासे यांनी केला.

सोमवारी हा निर्णय झाल्यानंतर देशाचे माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. पवारसाहेबांच्या माध्यमातून संबंध देशातील शेतकर्‍यांना आश्वस्त केले की, हा निर्णय बदलण्याच्यासंदर्भात सकारात्मक पावले उचलली जातील मात्र आज चार दिवस उलटून गेले परंतु कोणतीच हालचाल केंद्रसरकारने घेतलेली नाही. त्याचाच परिणाम कांदा प्रश्न आज मोठ्या प्रमाणात पेटलेला दिसत आहे.

राज्यातील व देशातील शेतकरी उध्वस्त होवू नये हे धोरण आणि भूमिका पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीने घेतली आहे असेही महेश तपासे यांनी सांगितले.

उरणच्या जेएनपीटी बंदरावर जवळपास ५ लाख मेट्रिक टन कांदा आज सडतोय. या नुकसानीला जबाबदार कोण? असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे.

लॉकडाऊनच्या काळात निर्यात साधारणपणे साडेतेरा टक्क्यांनी घसरली आहे. निर्यात बंदीमुळे साडे बाराशे कोटीची उलाढाल थांबलेली आहे. ही उलाढाल थांबवल्यानंतर स्वाभाविकपणे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी कांदा निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी विनंती महेश तपासे यांनी केली आहे.

चाळीसगावमधील (जळगाव) माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर २ जून २०१६ रोजी घरमालक भावेश कोठावले यांनी पैशाच्या देवाणघेवाणवरून प्राणघातक हल्ला केला होता. मात्र त्यावेळी भाजपचे सरकार असल्याने सोनू महाजन यांची तक्रार दाखल करून घेतली नव्हती. ३ जून रोजी सोनू महाजन यांच्या पत्नीने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती त्याचा निकाल ७ मे २०१९ रोजी आला. त्या निकालाच्या अंतर्गत संबंधितावर फिर्याद दाखल झाली मात्र कारवाई झाली नाही.

आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जनता दरबारात सोनू महाजन यांनी झालेल्या अन्यायाचे गार्‍हाणे मांडले. यावेळी सोनू महाजन यांनी भाजपचे खासदार उमेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांवर आरोप केले आहेत. जे काही तथ्य आणि सत्य असेल आणि कारवाई करायची असेल तर कुणालाही न घाबरता निपक्षपणे माजी सैनिकाला न्याय मिळावा ही भूमिका गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली असल्याचे महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, क्लाईड क्रास्टो, महेश चव्हाण, आदीक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement