– पुरावे गोळा करण्याच्या नावावर कुख्यात लाहोरी ग्रुपच्या समीर शर्माला अभय
– मौजा बोखारा येथील प्रकरणही आले समोर
नागपूर टुडे – कुख्यात समीर शर्मासह त्याच्या साथीदारांविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. दुसरीकडे कोराडी प्रमाणे अंबाझरी पोलिसही ‘फिक्स’ झाल्याने आरोपीची अटक टळल्याची चर्चा आहे. शर्मावर बळजबरीने एका फ्लॅटवर कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तर अशाच मौजा बोखारा येथील एका जमीनीवर कब्जा करण्याच्या प्रकरणात कोराडी पोलिसांनी समिर शर्मासह अन्य साथीदारांवर कारवाई करण्याचे टाळल्याचा आरोप आहे. चक्क तत्कालीन वरिष्ठ अधिकारीच लोभात पडल्याने सदर प्रकरण दडपल्या गेल्याची चर्चा आहे.
सदर दोन्ही प्रकरणे गंभीर स्वरुपाची आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्तालयाने नव्याने या प्रकरणांना गांभीर्याने घेतल्याची माहिती आहे. पंकज प्रफुल्लकुमार भंसाली (४८) रा. लेंड्रा पार्क, रामदासपेठ असे फिर्यादीचे नाव आहे. तर लालचंद विरभान मोटवाणी (३२) रा. फ्लॅट नं. ८०१, मॅजेस्ट्रीक हाईट अपार्टमेंट, बी विंग, समीर शर्मा (३५) रा. कमल बिअर बार इंदोरा चौक, राकेश रंजन (३५) रा. व्यवस्थापक, साहिल ऑफ्टिकल रुफ ९, धरमपेठ, (एलपीके ९, गौंड खैरी) अशी आरोपींची नावे आहे. यातील आरोपी समीर शर्मावर सीताबर्डीसह अंबाझरी पोलिसात खुनाचा प्रयत्नासह विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
प्राप्त माहितीनुसार, अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुकराम अपार्टमेंट, भूखंड क्रमांक ८६, घर क्रमांक ६८३, नगर भूमापन क्रमांक ३४ येथे सदनिका क्रमांक ३०१ हे फिर्यादीच्या मालकीचे आहे. हा फ्लॅट त्यांनी काही वर्षांंपूर्वी साहिल आप्टीकलचे मालक लालचंद विरभान मोटवानी (३२) रा. मॅजेस्टिक हाईट अपार्टमेंट यांना भाड्याने दिला होता.
पण, भाडे व सदनिका रिकामे करण्यावरून त्यांच वाद सुरू झाला. अनेक दिवसांपासून हा वाद सुरू होता. दरम्यान फिर्यादी भंसाली यांनी दिलेल्या पोलिस तक्रारीनुसार, सदर प्रकरण ४ एप्रिल ते ११ सप्टेंबर २०२० दरम्यानचे आहे. आरोपींनी बळजबरीने फ्लॅटचे कुलूप तोडून अवैध कब्जा केला. याबाबत फिर्यादीने आरोपींकडे विचारणा केली असता त्याला अश्लिल शिवीगाळ करुन फ्लॅट आमचा आहे, आणि खाली करायचा असल्यास आम्हाला ८० लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हणून फिर्यादीस गलावर व पाठीवर मारहाण करुन जखमी केले. यानंतर, लवकरच चालता हो, नाहीतर तुझे अपहरण करुन जीवानिशी ठार करु, अशी धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यासंदर्भात अंबाझरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय करे यांच्याशी संपर्क साधला असता, याप्रकरणी तपास सुरु असून सबळ पुरावे गोळा करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
कोराडी पोलिसांनी दडपले प्रकरण
मामा-भाचे असलेल्या मनोज शर्मा व समीर शर्मा यांचे कोराडीतील प्रकरण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या दबावात दडपण्यात आल्याचे बोलले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, मौजा बोखारा येथे लिलाबाई नंदलाला दीक्षित यांच्या मालकीची जमीन आहे. या जमीनीच्या मालकीसंदर्भातही समीर शर्मासह इतरांशी त्यांचा वाद सुरु आहे. बनावट कागदपत्रावर जमीन बळकावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दीक्षित यांना आरोप आहे. याप्रकरणी त्यांनी अनेक तक्रारी कोराडी पोलिसांकडे केल्या आहेत.
तसेच १६ ऑगस्ट २०२० ला न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदत्रावरील स्वाक्षरीतील तफावत बघता आरोपींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी लिलाबाई दीक्षित यांनी १९ ऑगस्ट २०२० रोजी कोराडी पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. ३१ जुलै २०२० रोजी सुद्धा त्यांनी कोरोडीमध्ये तक्रार केली होती. तत्पुर्वी शंभर दिडशे लोकांनी जमीनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कोराडी पोलिसांनी कारवाई करण्याचे टाळून उलट पाठबळ दिल्याचा आरोप पिडीत लिलाबाई दीक्षित यांचा मुलगा सुधीर नंदलाल दीक्षित यांनी केला आहे.