नवी दिल्ली : शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना उपोषणाच्या २०व्या दिवशी दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केल्यानंतर आंदोलनातील प्रमुख कार्यकर्ते अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
जंतर-मंतर येथे माध्यमांशी संवाद साधताना दिपके यांनी, आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात असून सरकार लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप केला. तसेच २० जुलै रोजी प्रस्तावित संसद मोर्चा कोणत्याही परिस्थितीत होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
देशाच्या संविधानावर विश्वास ठेवून आपण भारतात परतल्याचे सांगताना, आंदोलनकर्त्यांना बदनाम करण्याचे आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचे प्रयत्न होतील, याची कल्पना होती; मात्र संविधान न्याय देईल, असा विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका करत, “देशात हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू आहे,” असा आरोप केला. विद्यार्थ्यांवर लाठीमार होत असल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा करत, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी दिपके यांनी केली. विद्यार्थ्यांच्या मृत्यूंसाठी जबाबदारांवर कारवाई करण्याऐवजी आंदोलन करणाऱ्यांवरच कारवाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने आंदोलनस्थळावरून हटवण्यात आले, स्वयंसेवकांशी धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली तसेच आंदोलनकर्त्यांशी गैरवर्तन झाल्याचा दावाही त्यांनी केला.
आपले आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण राहील, असे स्पष्ट करत दिपके यांनी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. तसेच २० जुलैचा संसद मोर्चाही शांततेत पार पडेल, असा विश्वास व्यक्त करत देशभरात संविधानाच्या चौकटीत राहून शांततापूर्ण आंदोलन उभारण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.





