Published On : Mon, Dec 31st, 2018

सैन्य भरतीसाठी आलेल्या उमेदवाराचा मोबाईल चोरला

मोबाईल चोर वृध्दास १० मिनीटात पकडले

नागपूर : सैन्य भरतीसाठी नागपुरात आलेल्या एका तरुणाचा मोबाईल वृध्दाने चोरला. मात्र, सीसीटिव्हीच्या मदतीने अवघ्या दहा मिनीटात आरपीएफच्या पथकाने त्याला पकडले. वसंत उपाध्याय (६०, रा. इसासनी, हिंगणा) असे मोबाईल चोर वृध्दाचे नाव आहे. त्याला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Advertisement

गुरुवार २७ डिसेंबरपासून सैन्य भरती सुरू झाली. २ जानेवारी पर्यंत भरती आहे. त्यासाठी देशभरातील उमेदवार नागपुरात आलेत. राहण्याचे ठिकाण नसल्याने बहुतेक तरुण नागपूर रेल्वे स्थानकावरच थांबले आहेत. फिर्यादी नितीन गजाजन ठाकरे (२१, रा. वाशिम) हा तरुणही लष्कर भरतीसाठी नागपुरात आला. नागपूर रेल्वे स्थानकारील बुकींग कार्यालयाच्या समोर असलेल्या सभागृहात तो आराम करीत होता. त्याने मोबाईल चार्जिंगवर लावला काही वेळातच त्याला झोप आली. ही संधी साधून वसंत उपाध्यायने त्याचा चार्जिंगवरील मोबाईल चोरला. नितीनची झोप उघडली असता, त्याला मोबाईल दिसला नाही.

त्याने थेट आरपीएफ ठाणे गाठून सारा प्रकार सांगितला. मध्य रात्री २.०५ वाजताची ती वेळ होती. त्याने सांगितलेल्या वेळेनुसार सीसीटिव्ही फूटेज तपासण्यात आले. एक व्यक्ती चार्जिंगवरील मोबाईल चोरुन नेत असल्याचे दिसले.

प्रधान आरक्षक शशीकांत गजभिये, आर. के. भारती, वी. बी. घरत यांनी मोबाईल चोराचा शोध सुरू केला. अवघ्या १० मिनीटातच चोरास पकडले. त्याची चौकशी केली असता चार्जिंगवर असलेला मोबाईल चोरी केल्याची कबूली देत खिशातून एक मोबाईल काढून आरपीएफला दिला. आरपीएफने कायदेशिर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मोबाईल चोरास लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द केले.

Advertisement
Advertisement
Advertisement