| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jul 16th, 2018

  मनसेचं खड्ड्यांविरोधात खळ्ळ खट्याक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड

  नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावर पडलेले खड्डे व त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना यामुळे आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी (16 जुलै) तुर्भेतील पीडब्ल्यूडीचे कार्यालय फोडले. खड्डे बुजवण्याची मागणी करुन देखील प्रशासन दखल घेत नव्हते. अखेर मनसेनं पीडब्ल्यूडीचे कार्यालयाविरोधात आक्रमक भूमिका स्वीाकारत खळ्ळ खट्याक आंदोलन केले. सायन-पनवेल महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यामध्ये दोन वर्षांपूर्वी याच मार्गावर बांधलेल्या उड्डाणपुलांचादेखील समावेश आहे.

  यामुळे सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच वाढत जात आहे. अशातच खड्ड्यांमुळे अपघातदेखील होत आहेत. मागील 10 दिवसात उरणफाटा व जुईनगर येथे खड्ड्यातमुळे बाईक अपघातात दोन जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

  याप्रकरणी खात्याचे मंत्री व पीडब्ल्यूडीचे अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणीही मनसेने पोलिसांकडे केलेली आहे.
  दरम्यान, गेल्या आठवड्यात खड्ड्यांना मंत्र्यांची नावे देऊन महामार्गावरील सर्व खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणीदेखील मनसेने केली होती.

  याचीही दखल न घेतल्याच्या कारणामुळे अखेर सोमवारी सकाळी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, सचिव संदीप गलुगडे यांच्या नेतृत्वाखाली खळ्ळ खट्याक आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत तुर्भे येथील पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत मनसे कार्यकर्त्यांनी त्याठिकाणावरून पळ काढला होता.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145