
मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळ चर्चेत असलेला क्षण अखेर साकार झाला आहे. शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी अधिकृत युतीची घोषणा केली. मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मुंबईवरील मराठी नेतृत्व टिकवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असा ठाम संदेश दोन्ही नेत्यांनी दिला.
युतीच्या घोषणेदरम्यान खासदार संजय राऊत यांनी भावनिक भाष्य करत आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे सांगितले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीप्रमाणेच आज मराठी एकतेचा मंगल क्षण अनुभवायला मिळत आहे. ठाकरे नेतृत्वाखालीच महाराष्ट्र सुरक्षित आहे आणि या युतीमुळे मुंबईसह राज्यातील महापालिकांवर भगवा फडकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपवर जोरदार टीका करत आक्रमक भूमिका घेतली. मुंबईसाठी प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी संघर्ष केला आहे. आज दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना मुंबई खुपत आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचा राजकीय पराभव केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असे ठणकावून सांगत मराठी माणसाला एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीमागील वैचारिक भूमिका स्पष्ट करत सांगितले की, मतभेदांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हीच या एकत्र येण्याची मूळ प्रेरणा आहे. सध्या राज्यात पक्ष फोडण्याचे राजकारण सुरू असून, महाराष्ट्राला स्थैर्याची गरज आहे. ही युती केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून महाराष्ट्राच्या हितासाठी दीर्घकाळ टिकणारी आहे. मुंबईपासून सुरुवात असून, मुंबईचा महापौर हा मराठीच असेल आणि तो युतीचाच असेल, असा निर्धार राज ठाकरेंनी व्यक्त केला.
या घोषणेमुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.








