
नागपूर :शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य युतीवर राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे. दोन्ही पक्षांनी आपली राजकीय ताकद गमावल्यामुळेच अशी युती करण्याची वेळ आली असल्याचा आरोप त्यांनी केला.
बावनकुळे म्हणाले,उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची सध्याची अवस्था सर्वांनाच माहिती आहे. एकेकाळी २२८ जागांवर सत्ता असलेली शिवसेना आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत अवघ्या ८ जागांवर आली आहे. मुंबईतही त्यांची हीच स्थिती होणार आहे. त्यामुळेच त्यांनी हा पर्याय स्वीकारला आहे. या निर्णयासाठी आम्ही त्यांचे अभिनंदनच करतो,” असा टोला त्यांनी लगावला.
मुंबई महापालिका निवडणुकीत भावनिक मुद्द्यांपेक्षा विकासच निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट करत बावनकुळे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विकसित मुंबई’चा संकल्प मांडला असून, मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवण्याचे स्पष्ट मॉडेल तयार केले आहे. हे विकास मॉडेल आणि महापालिकेचा जाहीरनामा जनतेसमोर मांडून आम्ही निवडणूक जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
फक्त दोन भाऊ एकत्र आल्यामुळे सहानुभूतीची लाट निर्माण होईल, हा दावा बावनकुळे यांनी फेटाळून लावला.ते संपूर्ण मुंबई महानगरपालिकेत उमेदवार उभे करण्याच्या स्थितीतही नाहीत. निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक उमेदवार आणि कार्यकर्त्यांचीच त्यांच्याकडे कमतरता आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
शेवटी त्यांनी पुन्हा ठामपणे सांगितले की, भाजप आणि महायुतीचा एकमेव अजेंडा मुंबईचा सर्वांगीण विकास आणि तिला जागतिक दर्जाचे शहर बनवणे हाच आहे, आणि मुंबईकर जनता हाच विकासाचा दृष्टिकोन स्वीकारेल.








