नागपूर : नागपूरात माउंट रोडवरील येस बँक शाखेसमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) जोरदार आंदोलन छेडलं. हे आंदोलन एका कर्जदाराच्या अन्यायाविरुद्ध करण्यात आलं आहे.
प्राप्त माहितीनुसार, इंद्रजीत बळीराम मुळे या व्यक्तीनं जेसीबी खरेदीसाठी येस बँकेकडून कर्ज घेतलं होतं. मात्र काही हप्त्यांपासून हप्ते थकित राहिल्यामुळे बँकेनं जेसीबीवर कारवाई करत ती जबरदस्तीने ताब्यात घेतली आणि नंतर विक्रीसुद्धा केली.
या संपूर्ण प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे कर्जदार आरटीओ पासिंगसाठी जेसीबी घेऊन गेला असताना, त्याच वेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी चुपचाप जेसीबी ताब्यात घेऊन विक्रीचा व्यवहारही उरकला.
कर्जदार इंद्रजीत मुळे यांचं म्हणणं आहे की, ते गेल्या अनेक दिवसांपासून बँकेच्या फेऱ्या मारत आहेत. मात्र अद्याप त्यांना कोणतीही स्पष्ट माहिती किंवा न्याय मिळालेला नाही. अखेर हतबल होऊन त्यांनी मनसेकडं मदतीसाठी धाव घेतली.
त्यांच्या तक्रारीची दखल घेत मनसेनं तत्काळ आंदोलनाचं शस्त्र उचलत येस बँकेसमोर निदर्शने केली. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं.
“मी आरटीओ पासिंगसाठी जेसीबी घेऊन गेलो होतो. त्याचवेळी बँकेच्या लोकांनी ती उचलली. आता ती कुठे आहे, कुणी विकली, काही सांगत नाहीत. मी न्यायासाठी थकलो आहे. त्यामुळेच मी मनसेकडं गेलो, अशी माहिती कर्जदार इंद्रजीत मुळे यांनी दिली.