नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) च्या पूर्व नागपूर विभागीय कार्यालयात गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी मोठा गदारोळ करत स्थापत्य अभियंता सहाय्यक सुरेश चव्हाण यांच्या चेहऱ्यावर काळी शाई फासली. मनसेने त्यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप लावत हा तीव्र निषेध नोंदवला.
मनसेच्या म्हणण्यानुसार, २०१४ मध्ये सुरेश चव्हाण यांची एनआयटीमध्ये नियुक्ती झाल्यानंतरपासूनच त्यांच्यावर लाचखोरी व जनहिताच्या कामांमध्ये गोंधळ घालण्याचे आरोप सातत्याने होत आले आहेत. विशेषतः पट्टे मंजुरीसाठी २५ हजार रुपये आणि डिमांड नोट काढण्यासाठी तब्बल १२ लाख रुपयांची मागणी केल्याचे आरोप आहेत.
साल २०२३ मध्ये मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली एनआयटी कार्यालयासमोर भ्रष्टाचारविरोधी मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी मनसेने सुरेश चव्हाण यांच्यासह इतर अधिकाऱ्यांविरोधात दस्तऐवजासह तक्रारी एनआयटी प्रशासनाकडे दिल्या होत्या. त्यानंतर चव्हाण यांची बदली दक्षिण नागपूर विभागात करण्यात आली होती.
मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांची पुन्हा पूर्व नागपूर विभागात नियुक्ती करण्यात आल्याने मनसेने संताप व्यक्त केला आहे. विभागीय चौकशी सुरू असतानाही त्यांना पुन्हा जुन्या जबाबदाऱ्या देऊन नियुक्त करणे म्हणजे एनआयटी प्रशासन भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे चित्र असल्याचा आरोप मनसेने केला.
हीच नाराजी व्यक्त करत गुरुवारी मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत चव्हाण यांच्या चेहऱ्यावर काळं फासलं आणि त्यांना हार घालून निषेध व्यक्त केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, एनआयटी प्रशासन आणि पोलीस विभागाने तपास सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.