Published On : Sat, Mar 3rd, 2018

होळीच्या दिवशी मनपा-OCW ने वाचवले अंबाझरी तलावातील वाया जाणारे पाणी

Orange-City-Water-logo-1
नागपूर: पाणी वाचवा… पाणी अनमोल आहे… पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा… यातूनच जग वाचेल व भविष्य वाचेल… ही वाक्ये आपण दररोज ऐकत असतो, पण आपण खरंच त्यासाठी आवश्यक पाऊले उचलतो का? मनपा-OCWने मात्र सर्वांसाठीच उदाहरण ठेवत पाणी वाचवण्याची नुसती वक्तव्ये न करता पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याप्रतीची आपली कटिबद्धता आपल्या कामाद्वारे दाखवून दिली आहे.

रंगपंचमी (होळी) (मार्च २, २०१८)च्या दिवशी सकाळच्या वेळी एका स्थानिक जागरूक नागरिकाकडून दूरध्वनीद्वारे जलवाहिनी फुटली असल्याचे व प्रचंड पाणी वाया जात असल्याचे कळवण्यात आले. मनपा-OCW अधिकारी संजय गायकवाड, ED NESL व संजय रॉय, CEO, OCW यांच्या नेतृत्वात घटनास्थळी पोचले आणि १८ तासांच्या तांत्रिक कामांनंतर अंबाझरी तलावातील हजारो लिटर पाणी वाया जाण्यापासून वाचवले.

ही जलवाहिनी OCWची नसूनही OCWच्या चमूने याबाबत तपासणी केली. तपासणीनंतर हे लक्षात आले कि हे पिण्याचे पाणी नसून १९८० च्या काळातील एक बंद वाहिनी आहे, ज्याद्वारे त्याकाळात अंबाझरी तलावातील पाण्याचा पुरवठा शहराच्या काही भागांना होत असे.

ही जलवाहिनी इतर कुठल्या एजन्सीच्या मालकीची असूनही आणि त्याच्या व्हॉल्वची जागा माहित नसूनही मनपा-OCWच्या चमूने, ज्यामध्ये राजेश कालरा, प्रवीण शरण, अनिकेत गाडेकर व इतर मनपा अधिकाऱ्यांचा समावेश होता, महामेट्रोच्या चमूला मदत करण्यास सुरुवात केली ज्यांच्या कामादरम्यान ही वाहिनी क्षत झाली होती.

पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात वाहत होते कि ही गळती थांबविली गेली नसती तर अंबाझरी तलावाची पातळी खाली गेली असती. असे कळून आले आहे कि अंबाझरी तलावातील पाणी या ३६ वर्ष जुन्या जलवाहिनीद्वारे कायदेशीर/बेकायदेशीरपणे जवळील जलतरण तलावात वापरले जात होते.

मनपा-OCW यांनी जलप्रदाय विभागाचे निवृत्त अधीक्षक अभियंता, श्री. डी. व्हि. चौधरी यांचीही मदत घेतली, ज्यांच्या कार्यकाळात अंबाझरी तलावातून शहराच्या काही भागांना पाणीपुरवठा होत असे. १९८२ साली हा पुरवठा बंद करण्यात आला.


चमूने त्या काळातील (१९८२) अनेक व्हॉल्वचा शोध घेतला. अंती अंबाझरी तलावाजवळ आतवर गाडल्या गेलेले दोन व्हॉल्व सापडले व ते बंद करण्यात आले. दरम्यान, NMRCL (महामेट्रो)च्या चमूने गळतीच्या ठिकाणी कॉंक्रीट बॅग्स लावून पाण्याचा प्रवाह थांबवण्याचा प्रयत्न केला. चमूने डायव्हर्सची मदत घेऊन इनटेक वेल्सची दारे बंद करण्याचेही प्रयत्न केले.

शेवटी १६ ते १८ तासांच्या अथक परिश्रमानंतर आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावत मनपा-OCWच्या चमूने लिकेज दुरुस्त करण्यात यश मिळवले. ही वाहिनी १९८२ पासून कार्यान्वित नसल्याने हे काम जिकीरीचे होते. पण चमूने मेहनत करत हजारो लिटर पाणी वाया जाण्यापासून वाचवले.

ही गळती आता जरी दुरुस्त झाली असली तरी खरोखरच पाणी वाचवायचे असल्यास आता नागपूर शहराला स्मार्ट बनवण्यासाठी कार्यरत असलेल्या इतर एजन्सीजलादेखील सावध असायला हवे व जलवाहिन्या क्षतिग्रस्त होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी.

येथे उल्लेखनीय आहे की, नजीकच्या काळात नागपूर शहराच्या विकासासाठी कायर्रत असलेल्या KCC लि. व महामेट्रो यांच्या कामादरम्यान मनपा-OCWच्या जलवाहिन्या अनेक ठिकाणी क्षतिग्रस्त झाल्या आहेत. यामुळे हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले होते.