नागपूर, . विधान परिषदचे आमदार श्री संदीप जोशी यांनी विविध विकासाच्या मुद्द्यांवर आणि नागरी समस्यांवर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांच्या सोबत शुक्रवारी (ता. २५) महापालिकेच्या मुख्यालयात चर्चा केली. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, श्रीमती वैष्णवी बी आणि श्री. अजय चारठाणकर उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेच्या सभागृहाचा ठराव आणि मा. महापौर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीच्या अहवालानुसार २० सप्टेंबर २०१९ च्या आधीच्या मृत ऐवजदारच्या वारसांना व वैद्यकीय कारणामुळे मनपाच्या सेवेत रुजू नसणाऱ्या ऐवजदारांना ऐवजी कार्ड देण्यावर या बैठकीत चर्चा झाली. तसेच सोमवारी पेठ, बुधवारी बाजार येथील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्याबाबतही चर्चा झाली. बैठकीत नागपूर जिल्हा मौजा चिचभुवन येथील ८२ चौ. मी. शासकीय जागा स्मशानघाट बांधकामाकरिता मनपाला आगाऊ ताबा देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
तसेच मोहननगर येथे जुना क्षतीग्रस्त नाल्याचे बांधकाम करण्याबाबत आणि मनपा शाळेला खेळ मैदान बनविण्याबाबत चर्चा करण्यात आली. आमदार श्री जोशी यांनी सुरेंद्र नगर मनपा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील हॉल व लॉन टेनिस मैदानामधील मोकळी जागा फ़ुटबाँल प्रशिक्षणाकरिता उपलब्ध करण्यासाठी चर्चा केली. आयुक्तांनी या मुद्द्यांवर निर्णय घेण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले.
या वेळी परिवहन व्यवस्थापक श्री. विनोद जाधव, उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, उपसंचालक नगर रचना श्री. किरण राऊत, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, घन कचरा विभागाचे नोडल अधिकारी डॉ गजेंद्र महल्ले, क्रीडा अधिकारी श्री. पियुष आंबुलकर उपस्थित होते.