नागपूर: जागतिक हिवताप दिनानिमित्त शुक्रवारी (ता.२५) नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनमध्ये हिवताप जनजागृती रॅली काढण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात हिवताप व हत्तीरोग विभागामार्फत ही रॅली काढण्यात आली.
शुक्रवारी २५ एप्रिल रोजी नागपूर शहरातील दहाही झोन मधून प्रभातफेरी काढून लोकांमध्ये हिवताप, डेंग्यु व इतर किटकजन्य आजाराबाबत लोकांचा सहभाग घेऊन जनजागृती करण्यात आली. याशिवाय प्रत्येक झोनस्तरावर वर्दळीच्या ठिकाणी प्रदर्शनी व नि:शुल्क गप्पीमासे वाटप कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते.
लक्ष्मीनगर झोनद्वारे लक्ष्मीनगर झोन ते प्रतापनगर, स्वावलंबी नगर, परसोडी, गोपालनगर या भागात जनजागृती रॅली काढण्यात आली व त्रिमुर्ती नगर उद्यान येथे प्रदर्शनी लावण्यात आली. धरमपेठ झोनद्वारे चामडीचा नाला ते शाळेच्या मागे चिल्ड्रन पार्क पर्यंत जनजागृती रॅली आणि ट्रॅफिक पार्क येथे प्रदर्शनी लावण्यात आली. हनुमाननगर झोनद्वारे मयुर मंगल कार्यालय गणेश नगर या भागात जनजागृती रॅली काढण्यात आली व मजदुर भवन समाज कल्याण कार्यालय चंदन नगर येथे प्रदर्शनी लावण्यात आली. धंतोली झोनद्वारे कुंजीलाल पेठ त्रिशरण चौक या भागात रॅली आणि प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. नेहरूनगर झोनच्या वतीने दिघोरी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रॅली व प्रदर्शनी आयोजित करण्यात आली. गांधीबाग झोनतर्फे गांधीबाग उपपथक ते नातिक चौक ते तिलक पुतला ते ब्राम्हण वाडी ते शिवाजी पुतळा ते दक्षिणामुर्ती चौक ते चिटणीस पार्क या भागातून जनजागृती रॅली काढण्यात आली.
तसेच गांधीबाग तलाव बैरागीपुरा येथे प्रदर्शनी लावण्यात आली. सतरंजीपुरा झोनतर्फे मनोज हॉटेल बैरागीपुरा या भागातून रॅली काढून नाईक तलाव बैरागीपुरा येथे प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. लकडगंज झोनद्वारे आंबेडकर उद्यान वर्धमाननगर, छापरू नगर येथे रॅली आणि प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. आशीनगर झोनद्वारे चारखंबा चौक ते वैशालीनगर पर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली व पाचपावली सुतिका गृह येथे प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी झोनद्वारे न्यु कॉलनी उद्यान पासुन सुदर्शन कॉलनी ते छावणी पर्यंत रॅली काढून सखाराम मेश्राम उद्यान येथे प्रदर्शनी आयोजित करण्यात आली.
मनपाच्या दहाही झोनद्वारे राबविण्यात आलेल्या उपक्रमांना नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. उपक्रमांच्या आयोजनासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या मार्गदर्शनात हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. मंजुषा मठपती यांच्या नेतृत्वात झोन स्तरावरील कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.