Published On : Tue, Sep 26th, 2017

गुटका विक्रीसाठी रेल्वेत अल्पवयीनांंचा वापर

नागपूर: मद्य तस्करीसह रेल्वेत गुटका विक्रीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर केला जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. आरपीएफ जवान विकास शर्मा यांच्या प्रयत्नाने या प्रकाराचा भंडाफोड झाला. दोन्ही मुलांना ‘चाईल्ड लाईन’च्या स्वाधीन करण्यात आले.

मद्य तस्करीसाठी सुशिक्षित बेरोजगार, महिलांचा वापर केला जायचा. मात्र, आरपीएफचे अटक सत्र सुरू झाल्याने अल्पवयीन मुलांकडून तस्करी व्हायची. त्यावरही आरपीएफने नियंत्रण मिळविले. आता गुटका विक्रीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याचे आजच्या घटनेवरून स्पष्ट झाले. आज दुपारी शर्मा फलाट क्रमांक एकवर कर्तव्यावर होते. त्यांना ११ व १२ वर्षांची दोन मुले आढळली. शर्माने त्या दोघांचीही आस्थेनी विचारपूस केली. मात्र, त्यांच्या बोलण्यावरून ते संकटात सापडले असल्याचे जाणवले. त्यामुळे आधी त्यांना जेवण दिले. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांनी दिलेली माहिती धक्कादायक होती.

दोन्ही मुले बल्लारशाहची. एकाला आई आहे तर दुसºयाला कोणीच नाही. त्यांंच्या समोर जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. ही संधी ‘कॅश’ करीत एका गुटका विक्रेत्याने त्यांना रेल्वेत गुटका विक्रीसाठी पाठविले. विक्रीनंतर त्यांना पैसे देतो. नेहमीप्रमाणे दोघेही बल्लारशाहहून जीटी एक्स्प्रेसने गुटका विक्रीकरीता नागपूरपर्यंत आले. मात्र, प्रवाशांच्या गर्दीत त्यांचा गुटकाच चोरी गेला. त्यामुळे दोघेही विचारात पडले. आता काय करावे, मालकाला काय सांगावे असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला. दरम्यान, शर्माने त्या दोघांनाही ठाण्यात आणले. ही गंभीर बाब वरिष्ठ सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतीजा यांना सांगितली. लगेच ‘चाईल्ड लाईन’चे प्रतिनिधी इशांत यांना बोलावून घेतले. संपूर्ण कारवाईनंतर त्या दोघांनाही ‘चाईल्ड लाईन’च्या स्वाधीन करण्यात आले.