नागपूर : अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या गुलमोहर कॉलनीत आज दुपारी धक्कादायक घटना घडली. एका अल्पवयीन मुलाने १६ वर्षीय विद्यार्थिनीवर चाकूने वार करत तिचा जागीच खून केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थिनी अजनीतील सेंट अँथोनी स्कूलमध्ये शिकत होती. शाळा सुटल्यानंतर ती घरी जात असताना आरोपीने फोन करून तिला भेटायला बोलावले. दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. वादाच्या भरात आरोपीने खिशातून चाकू काढून तिच्यावर वार केले.
आरोपीने सलग वार केल्यामुळे मुलीचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर आरोपी तिथून फरार झाला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी अल्पवयीन मुलाचा शोध सुरू केला आहे. या हत्याकांडामुळे गुलमोहर कॉलनीसह संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.