Published On : Thu, Apr 5th, 2018

तूर आणि हरभरा खरेदीला गती देण्यासाठी गोदामे ताब्यात घेण्याचे पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे निर्देश

Advertisement

मुंबई: शेतकऱ्यांची तूर तसेच हरभरा खरेदीला गती देण्यासाठी जिल्हास्तरावरील उपलब्ध असलेली गोदामे ताब्यात घेण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिले.

हमीभावाने खरेदी सुरू असलेल्या खरेदी केंद्रावरील गोदामांच्या अनुषंगाने श्री. खोत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री. खोत म्हणाले, तूर व हरभऱ्याची हमीभावाने खरेदी सुरू असलेल्या खरेदी केंद्रावरील खरेदीच्या कामाला गती द्यावी. ठरवून दिलेल्या कालमर्यादेत खरेदी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था करण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने प्रयत्न करावेत. यासाठी महसूल यंत्रणेची मदत घेण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही श्री. खोत म्हणाले.

श्री. खोत यांनी यावेळी तूर व हरभरा खरेदीचा तसेच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आणि विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या गोदामातील उपलब्ध साठवण क्षमतेचा आढावा घेतला. जिल्हानिहाय आढावा घेतला. उद्दिष्टापेक्षा कमी खरेदी झालेल्या केंद्रांवरील खरेदीला गती द्यावी. गोदामांतील साठवण क्षमता पाहता अधिक गोदामांची आवश्यकता लागणार असून त्यासाठी जिल्हास्तरावरील गोदामांची उपलब्धता तपासून तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच केंद्रीय वखार महामंडळाची गोदामेही उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावेत, असेही श्री. खोत म्हणाले.

बैठकीस महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश म्हसे, राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघाच्या (नाफेड) पश्चिम विभागाच्या शाखा व्यवस्थापक श्रीमती वीणा कुमारी, पणन विभागाचे उपसचिव के. जी. वळवी, विदर्भ सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक एस. हरिबाबू, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे सरव्यवस्थापक के. जी. कानडे, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक तथा सचिव अजित रेळेकर, वरिष्ठ व्यवस्थापक अविनाश पांडे आदी उपस्थित होते.