Published On : Thu, Apr 5th, 2018

मध्य भारतातील कर्करोग रुग्णांसाठी चंद्रपूरचे कर्करोग रुग्णालय उपयुक्त – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : मध्य भारतातील कर्करोग रुग्णांना चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल उपयुक्त असल्याने या रुग्णालयाचे काम वेगाने पूर्ण करावे, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

आज श्री.मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात यासंदर्भात बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने चंद्रपूर येथे कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात येत आहे, यात टाटा ट्रस्टची प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी काम करत आहे. हॉस्पिटलचा एकूण खर्च 190 कोटी रु. चा आहे, यात 113 कोटी रु. चा बांधकामाचा खर्च राज्य शासन करणार आहे तर 77 कोटी रु. चा खर्च टाटा ट्रस्टच्या वतीने हॉस्पिटल मधील यंत्रसामग्रीसाठी करण्यात येईल.

जिल्हा खनिज प्राधिकरण, टाटा ट्रस्ट आणि वैद्यकीय शिक्षण संचालनालय या तीन यंत्रणांमध्ये सामंजस्य करार करण्यात येणार आहे त्याचा मसुदा तयार करण्याच्या सूचनाही वित्तमंत्र्यांनी दिल्या. टाटा ट्रस्ट रुग्णालयासाठी लागणाऱ्या सर्व एक्स्परटाईज उपलब्ध करून देणार आहे तर मुंबईचे टाटा मेमोरियल रुग्णालय चंद्रपूर कॅन्सर रुग्णालयातील डॉक्टरांना प्रशिक्षण आणि इतर संदर्भ सेवा देणार आहे. चंद्रपूर येथे अद्ययावत कर्करोग रुग्णालय झाल्यास छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यासह चंद्रपूर भागातील कर्करोग रुग्णांना ही मोठा दिलासा मिळेल, त्यामुळे या रुग्णालयाचे काम वेगाने पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. बैठकीत वित्तमंत्र्यांनी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाचाही आढावा घेतला, ते म्हणाले की चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे काम 30 जुलै 2019 पर्यंत पूर्ण करण्याचा विभागाने प्रयत्न करावा.