| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Feb 2nd, 2018

  बर्डी ते बीडगाव फाटा बससेवेचा शुभारंभ

  नागपूर : नागपूर महानगरपालिका परिवहन विभागाद्वारे बर्डी ते बीडगाव फाटा शहर बसचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते बुधवार (ता.१) ला तरोडी येथे झाला. यावेळी परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे प्रामुख्याने उपस्थित होते.

  बर्डी ते बीडगाव शहर बस सुरू करण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती. परिवहन समिती सभापती बंटी कुकडे व परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी पुढाकार घेऊन ही बस सेवा सुरू केली. ही बस सेवा सुरू झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

  बर्डी ते शिवनी ही बससेवा बीडगाव मार्गे बिडगाव फाटा, तरोडी गाव, खेडी, तितूर फाटा मार्गे बर्डी अशी धावणार आहे. या बसचे प्रवासी भाडे पूर्ण ३० रूपये, अर्धे तिकीट १५ रूपये इतके आहे. बर्डीवरून पहिली बस सकाळी ९.३० वाजता तर शेवटची बस दुपारी ३.३० वाजता सुटणार आहे. बीडगाव फाटावरून ही बस सकाळी ११.०० वाजता तर शेवटची बस संध्याकाळी ५.२० वाजता सुटणार असल्याची माहिती परिवहन विभागाचे रामराव मातकर यांनी दिली.

  कार्यक्रमाला रमेश चिकटे, विनोद पाटील, अनिता चिकटे, अरविंद फुलझेले, बंडु ठाकरे, रमेश चांभारे, मंदाताई मुब्बा, लिलाताई काळे, निशाताई सावरकर, मनोहर चिकटे प्रामुख्याने उपस्थित होते.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145