Published On : Mon, Oct 7th, 2019

दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी आज घेणार प्लास्टिक मुक्तीची शपथ

Advertisement

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीचा आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आढावा

नागपूर : १९५६च्या धम्मक्रांतीची साक्ष देणा-या दीक्षाभूमीवर उद्या मंगळवारी (ता.८) लाखो बौद्ध अनुयायी दाखल होणार आहे. दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य समारंभात उद्या मंगवारी लाखो बौद्ध बांधव प्लास्टिक मुक्तीची शपथ घेणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवरुन अनुयायांना बौद्ध धम्माची वाट दाखवून नवी क्रांती घडवून आणली होती. त्याच क्रांतीभूमीतून पर्यावरणपूरक उज्ज्वल भवितव्‍यासाठी प्लास्टिक मुक्तीची क्रांती घडणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या ‘सिंगल यूज प्लास्टिक मुक्ती’ अभियानाद्वारे धम्मचक्र प्रवर्तनदिनी जनजागृती केली जाणार आहे.

सोमवारी (ता.७) मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी दीक्षाभूमीवरील तयारीची पाहणी केली व आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, कार्यकारी अभियंता धनंजय मेंढुलकर, कार्यकारी अभियंता ए.एस.मानकर, कार्यकारी अभियंता अविनाश बारहाते, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.सुनील कांबळे, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य डॉ.सुधीर फुलझेले आदी उपस्थित होते.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशाच्या विविध भागातून येणा-या बौद्ध अनुयायांकरिता नागपूर महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांची आयुक्तांनी पाहणी केली. अनुयायांना कोणताही त्रास होउ नये, परिसरात स्वच्छता राहावी, सर्वत्र पुरेशी विद्युत व्यवस्था असावी, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था असावी यासाठी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांचेकडून वेळोवेळी पाहणी करुन आढावा घेतला जात आहे. दीक्षाभूमीवर सुविधांसाठी मनपाच्या सर्व विभागाने व त्यांच्या चमून जबाबदारीने कर्तव्य पार पाडून नागरिकांना असुविधा होउ नये याची पुरेपूर काळजी घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. याशिवाय धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य समारंभ व त्यापुढील दिवशीही आकस्मिक भेट देउन आयुक्तांकडून सुविधांची पाहणी केली जाणार आहे.

नागरिकांच्या सुविधेसाठी दीक्षाभूमी चौकातील लोकशाहीर अण्णाभाउ साठे यांच्या पुतळ्याजवळ नागपूर महानगरपालिकेचे नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. येथे नागरिकांना आवश्यक मदत केली जाणार आहे. याशिवाय नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस नियंत्रण कक्ष व मनपा नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक परिसरात ठिकठिकाणी फलकाद्वारे व एलईडी स्क्रीनवर दर्शविण्यात येणार आहे, त्यामुळे नागरिकांनी अडचणीच्या प्रसंगी नियंत्रण कक्षात संपर्क साधण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

परिसरात प्लास्टिक मुक्तीबाबत जनजागृती करणारे फलकही विविध ठिकाणी दर्शविण्यात आले आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन मुख्य समारंभ व दीक्षाभूमी परिसरात असलेल्या डिजीटल स्क्रीनवरही प्लास्टिक मुक्ती व पोलिस आणि मनपा नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक दर्शविण्यात आले आहेत.

परिसरात स्वच्छतेसाठी मनपाचे स्वच्छता कर्मचारी अविरत सेवा देत असून मनपातर्फे आरोग्य सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय प्रसाधनगृह व येथील परिसरात स्वच्छतेसह पुरेशी विद्युत व्यवस्था करण्यात आली असून याबाबतही आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाहणी केली व निदर्शनास आलेल्या त्रुट्या त्वरीत दुरूस्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

सिंगल यूज प्लास्टिक मुक्ती जनजागृतीसाठी चमू
सिंगल यूज प्लास्टिक मुक्तीबाबत जनजागृतीसाठी मनपाची चमू निर्धारित करण्यात आली असून या चमूद्वारे दीक्षाभूमी परिसरातील सर्व स्टॉल्सना भेट देउन सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत जनजागृती केली जात आहे. सिंगल यूज प्लास्टिकमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिकची माहिती देउन त्याचा वापर होउ नये यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन मनपातर्फे केले जात आहे. याशिवाय जनजागृती करणारे पत्रके वितरीत करुन नागरिकांना सिंगल यूज प्लास्टिकचा वापर न करण्याचे आवाहन केले जात आहे.

नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक
दीक्षाभूमीवर दाखल होणा-या लाखो बौध्द अनुयायांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासन व नागपूर महानगरपालिका सज्ज आहे. नागरिकांना भेडसावणा-या अडचणी सोडविण्यासाठी नियंत्रण कक्ष तैनात असून नागरिकांना येथे संपर्क साधता येईल. दीक्षाभूमी चौकातील लोकशाहीर अण्णाभाउ साठे पुतळ्याजवळ मनपाचे नियंत्रण कक्ष असून आकस्मिक परिस्थितीत मनपा नियंत्रण कक्षाला 0712-2227711, 0712-2234655, 0712-2227707 या तर पोलिसांना 100, रुग्णवाहिकेसाठी 108, अग्निशमन सेवेसाठी 0712-2567777, 0712-2567101 क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळविता येईल.