महिनाभर कोरोना संकटाशी झुंजल्यानंतर फ्लाइंग शीख मिल्खा सिंह यांचे ९१व्या वर्षी निधन झाले. मागच्या आठवड्यात त्यांची पत्नी निर्मल कौर मिल्खा सिंह (८५) यांचे कोरोनामुळे निधन झाले. काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंह कोरोना निगेटिव्ह झाल्याचा रिपोर्ट आला. पण काही दिवसांतच मिल्खा सिंह यांची प्रकृती पुन्हा ढासळली. त्यांना चंदिगडच्या पीजीआय हॉस्पिटलमध्ये आयसीयू विभागात ठेवले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.
पत्नीचे निधन झाले त्यावेळी आयसीयूमध्ये असल्यामुळे मिल्खा सिंह अंत्यविधीला अनुपस्थित होते. काही दिवसांतच त्यांचेही निधन झाले. यामुळे मिल्खा सिंह यांचा मुलगा प्रसिद्ध गोल्फपटू जीव मिल्खा सिंह आणि संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
भारताचे ऑलिंपिक आणि राष्ट्रकुलसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिल्खा सिंह यांना मिळाली होती. मिल्खा सिंह यांनी भारतासाठी १९५८ आणि १९६२च्या एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. अॅथलीट, धावपटू म्हणून त्यांची ख्याती होती. मिल्खा सिंह यांच्या निधनाचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.
आपण एक महान खेळाडू गमावला. या खेळाडूने देशाला मोठी स्वप्न बघायला आणि ती प्रत्यक्षात आणायला शिकवले. असंख्य भारतीयांच्या हृदयात मिल्खा सिंह यांना आदराचे स्थान आहे. मिल्खा यांचे असंख्य चाहते होते. त्यांच्या निधनाने मी दुःखी आहे; अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला शोक प्रकट केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मिल्खा सिंह यांच्या निधनाचे वृत्त कळताच शोक प्रकट केला.