Published On : Mon, Aug 19th, 2019

मिहानला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध

केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांचेप्रतिपादन

नागपूर : मेट्रो, रस्ते प्रकल्प, मल्टी मोडल हब यामूळे मिहान प्रकल्पाला जागातिक दर्जाच्या पायाभूत सुविधा मिळत आहेत. एच. सी. एल. कंपनीने आपल्या नागपूर येथील कॅम्पसमधून 8 हजार युवकांना रोजगार देण्याचे मान्य केले आहे. यामूळे विदर्भातील अभियांत्रिकी व तांत्रिक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी नागपूरातच उपलब्ध झाल्या असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज नागपूरात सांगितले.

मिहान येथील एच. सी. एल. कंपनीच्या विस्तारित कॅम्पसच्या संदर्भातील सामंजस्य कराराचे हस्तांतरण महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड (एम. ए. डी. सी.) व एच. सी. एल. यांच्या दरम्यान आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी एम. ए. डी. सी. चे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुरेश काकाणी,एच. सी. एल. चे. मुख्य मानव संसाधन अधिकारी अप्पाराव, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

एच. सी. एल. सारख्या कंपन्यानी आपल्या कॅम्पसव्दारे कौशल्य प्रशिक्षण देण्याचे कार्य केले आहे. मिहानमध्ये एयर क्राफ़्ट बनविणा-या कंपन्या गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत, यासाठी एम. ए. डी. सी. ने पुढाकार घ्यावा, असे गडकरी यावेळी म्हणाले.

एच. सी. एल. तर्फे स्थानिकांना रोजगार देण्यासंदर्भात बोलतांना मुख्य संसाधन अधिकारी अप्पाराव यांनी सांगितले की, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एक वर्षाच्या ‘एच.सी.एल. टेक. बी.ई.ई’ या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एक वर्षाचे ‘ऑन द जॉब’ प्रशिक्षण संपवून ‘बिटस् पिलानी’ व ‘शास्त्रा’ विद्यापीठाच्या पदव्या काम करत असतानांच संपादन करण्याची संधी मिळणार आहे. शिक्षणासोबतच रोजगार उपलब्ध करणारा हा एक प्रकारचा ‘वर्क ओरीऐंटेंड प्रोगाम’ असून या अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीचा प्रारंभ आज नागपूरात होत असल्याचे अप्पाराव यांनी सांगितले.

मिहानमध्ये स्वस्त दरात वीज उपलब्ध असल्याने उद्योग समूह मोठया प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. उद्योगस्नेही वातावरणा निर्मिती मूळे शैक्षणिक संस्था व रोजगार यांचा समन्वय आता नागपूरात साधता येत आहे, असे मत पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले.

या कार्यक्रमाप्रसंगी सामंजस्य कराराचे हस्तांतरण एच. सी. एल. चे कार्यकारी उपाध्यक्ष संजय गुप्ता व एम. ए. डी. सी. चे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुरेश काकाणी यांच्या उपास्थितीत करण्यात आले. यावेळी खासदार कृपाल तुमाने, डॉ. विकास महात्मे, आमदार समीर मेघे व एच.सी.एल. एम.ए.डी.सी. चे अधिकारी कर्मचारी उपास्थित होते.