Published On : Tue, Mar 17th, 2020

पाणी प्रश्नावर म्हाडा क्वॉर्टरवासीयांना दिलासा

Advertisement

आमदार मोहन मते व स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी घेतली म्हाडाच्या अधिका-यांची बैठक

नागपूर, : पिण्याच्या पाण्याच्या प्रलंबित प्रश्नावर अखेर रघुजीनगर म्हाडा क्वॉर्टरवासीयांना दिलासा मिळाला आहे. दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते व स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी पुढाकार घेउन म्हाडाच्या अधिका-यांसह संबंधित रहिवासी नागरिकांची बैठक आयोजित केली होती.

मनपा मुख्यालयातील स्थायी समिती सभापती कक्षामध्ये झालेल्या बैठकीत दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, नगरसेविका उषा पॅलेट यांच्यासह जलप्रदाय विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, म्हाडाचे सीईओ श्री. आडे, कार्यकारी अभियंता दिप्ती काळे आदी उपस्थित होते.

रघुजीनगर येथील म्हाडा क्वॉर्टरमध्ये १२८ निवासी गाळे आहेत. सदर इमारतीमध्ये मनपाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र अनेक वर्ष पाणी बिल न भरण्यात आल्याने मनपाच्या जलप्रदाय विभागाचे ७ लाख ७५ रुपये म्हाडाकडे प्रलंबित होते. जलप्रदाय विभागाद्वारे अनेकदा नोटीस बजावूनही म्हाडाद्वारे पाणी बिल न भरण्यात आल्याने मनपाद्वारे पाणी कनेक्शन कापण्यात आले. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला.

मनपाद्वारे पाणी कनेक्शन कापण्यात आल्याने म्हाडा क्वॉर्टर येथील १२८ कुटुंबियांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. याबाबत अनेकदा म्हाडाकडे तक्रार करूनही कोणतिही कार्यवाही न झाल्याने स्थानिक नागरिकांनी दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्याकडे तक्रार मांडली. सदर प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत आमदार मते यांनी स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांच्यासह मनपा व म्हाडाच्या अधिका-यांची बैठक बोलाविली. याबाबतचे अडथळे दूर करून नागरिकांना तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याचेही त्यांनी निर्देशित केले. मनपा व म्हाडाच्या समन्वयाने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.