Published On : Tue, Aug 27th, 2019

यमराज आणि चित्रगुप्तानी वाहनचालकाना सांगितले ट्रैफिक चे नियम, महामेट्रो चा उपक्रम

Advertisement

नागपूर- हिंगणा मार्गावरील रिच-3- लोकमान्य नगर ते सिताबर्डी येथे लवकरच मेट्रो सेवा सुरु करण्याचा महा मेट्रोचा मानस असून एक्वा लाइन सुरु करण्यासाठी महा मेट्रो तर्फे सर्वोपरि तयारी सुरु आहे. याच अनुषंगाने आज एक्वा लाईनवर “रस्ता सुरक्षा अभियानाला” मंगळवार, दिनांक 27 ऑगस्ट पासून सुरवात करण्यात आली. नागपूर मेट्रो तर्फे राबविण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा अभियानाला पहिल्याच दिवशी नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उत्तर अंबाझरी मार्गावरील शंकर नगर चौक, अलंकार टॉकीज चौक आणि झांसी राणी चौक या सर्व गर्दीच्या ठिकाणी वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. नागपूरकरांनी मोठ्या प्रमाणात मेट्रोचा वापर करावा या उद्देशाने मिशन 3 लाख या अंतर्गत सदर अभियान राबविण्यात येत आहे.

रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून यमराज आणि चित्रगुप्त यांची वेषभूशा करून हेलमेट न घातलेल्या दुचाकी वाहन चालकांना हेलमेटचा वापर करण्यास सांगितले. तसेच चार चाकी वाहन चालकांने नेहमी सीटबेल्ट लावणे, वाहन चालवतांना समोरच्या वाहन पासून सुरक्षित अंतर ठेवणे, मोठ्या वाहनाच्या जवळून गाडी चालवू नये, वाहन चालवतांना इंडिकेटरचा वापर करणे, बांधकाम स्थळी वाहन चालवतांना आवश्यक ती दक्षता घेणे, वाहन चालवतांना मोबाइलचा वापर टाळणे ई. महत्वाचे नियम नागरिकांना समजावून सांगण्यात आले.

रस्त्यावरील वाहनचालकांना व पायी चालणाऱ्या नागरिकांना रस्ते सुरक्षतेचे महत्व पटवून देणे तसेच जनजागृती करण्याचा कार्यक्रम आज राबविण्यात आला. याअंतर्गत नागपूर मेट्रोच्या सुरक्षा विभागाच्या चमूने मेट्रो मार्गिकांवरील गर्दीच्या ठिकाणी, चौ-रस्त्यावर आणि ट्राफिक सिग्नल वर वाहनचालकांना वाहतुकीचे नियम समजावून सांगितले. एक्वा मार्गिकेवरील गर्दीच्या ठिकाणी, प्रमुख ट्राफिक सिग्नलवर आणि शहरातील शाळा व महाविद्यालयात रस्ते सुरक्षाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने असे विविध उपक्रम महा मेट्रो नागपूरतर्फे सातत्याने राबविण्यात येणार आहे.