Published On : Mon, Sep 20th, 2021

सीताबर्डी येथील जुन्या पुस्तक विक्रेत्यांना मेट्रोने जागा उपलब्ध करून द्यावी.- पालकमंत्री

Advertisement

नागपूर : सीताबर्डी येथील वर्षानुवर्ष जुनी पुस्तके विकणाऱ्या दुकानदारांना मेट्रोने पुस्तक विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले.

स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांना तसेच विविध क्षेत्रातील संशोधक व अभ्यासक मोठ्या प्रमाणावर जुनी पुस्तके विकत घेतात. अनेक वर्षापासून हे पुस्तक विक्रेते करत असलेल्या व्यवसायाचे नुकसान होणार नाही, या दृष्टीने प्रयत्न करावे, असे श्री. राऊत यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पुस्तक विक्रेत्यांच्या अडचणीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी विमला आर., महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन बी. नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्थचे अध्यक्ष नरेश वाहाणे, मेट्रोचे कार्यकारी संचालक प्रशासन अनिल कोकाटे उपस्थित होते.

मेट्रोची 20 मजली इमारत फ्रीडम पार्क येथे होणार आहे. त्यात जुन्या पुस्तक विक्रेत्यांना दहा बाय दहा किंवा आठ बाय दहा अशा स्वरूपात पर्यायी जागेची व्यवस्था करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. पुढील पंधरा दिवसानंतर या विषयाचा पुन्हा आढावा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीनंतर गुरूकृपा कॉलोनी कॅन्टोनमेंट कामठी येथील मुख्य रस्ता पुन्हा सुरू करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांनी तिथे भेट देऊन पाहणी करावी व पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक अभिजित जिचकार उपस्थित होते.