Published On : Sat, Sep 30th, 2017

मेट्रो रेल्वे प्रकल्प आर्थिक विकासाचे ग्रोथ इंजिन – देवेंद्र फडणवीस

Advertisement

Fadnavis, Gadkari flag off Majhi Metro trial run, Nagpur
नागपूर: नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे जलद दळण-वळणाच्या सुविधा उपलब्ध होणार असून या प्रकल्पामुळे २० हजार लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच मेट्रो रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून अत्याधुनिक सेवा व सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे हा प्रकल्प आर्थिक विकासाचे ग्रोथ इंजिन असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर मेट्रोच्या ट्रायल रनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर माझी मेट्रोला प्रत्यक्ष सुरुवात झाली. नागपूर मेट्रो प्रकल्प हा शहराचे चित्र बदलणारा महत्वाकांक्षी प्रकल्प असून केवळ २७ महिन्यात साडेपाच किलोमीटरच्या ट्रायल रनला सुरुवात झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या महाकार्ड सेवेचा शुभारंभही यावेळी झाला.

मिहान प्रकल्प परिसराच्या मिहान डेपो येथे नागपूर मेट्रोच्या ट्रायल रन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष श्रीमती अरुंधती भट्टाचार्य विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर महापौर नंदाताई जिचकार, खासदार कृपाल तुमाने, डॉ. विकास महात्मे, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, समीर मेघे, डॉ.मिलिंद माने, सुधीर पारवे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय सचालक डॉ.ब्रिजेश दीक्षित, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, नासुप्रचे सभापती डॉ.दीपक म्हैसेकर आदी उपस्थित होते.


सर्वांच्या स्वप्नातील माझी मेट्रो वेगाने आकार घेत आहे. या वेगाने देशातल्या कोणत्याही मेट्रोचे काम पुढे गेले नसल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले तसेच नागपूर मेट्रो बुटीबोरी, हिंगणा, कन्हानपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मेट्रो स्टेशनच्या माध्यमातून नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे रस्त्यावरील ताणही कमी होईल. मॉरेस कॉलेज टी पाइंट तसेच पुणे येथील स्वारगेट येथे मोठा हब महामेट्रोतर्फे उभारण्यात येणार असून सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्पाच्या प्रगतीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


एसबीआयच्या महाकार्डद्वारे सर्व सेवांचा लाभ
स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे मेट्रो रेल्वेसाठी महाकार्डचा शुभारंभ होत असून या कार्डाद्वारे रेल्वेसह सर्व सुविधांसाठी कार्डचा वापर होणार आहे. त्यामुळे महामोबिलिटी कार्ड राज्यातील सर्व मेट्रो, बस, टोल नाके, महानगरपालिका आदी साठी एकत्रितपणे लागू करण्यात येणार असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, स्टेट बँकेने मेट्रो सेवा सुरु होण्यापूर्वीच महाकार्ड लाँच केले आहे. पोर्टतर्फे वाहतूक मार्गदर्शनासंबंधात ॲप तयार करण्यात आले असून तीनशे मीटर परिसरात जीपीएस सिस्टीमद्वारे वाहतुकीच्या मार्गासंदर्भात मार्गदर्शन मिळणार आहे. ही सुविधा नागपूरसह राज्यात सुरु करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गासाठी कोरियाचे सहकार्य
महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी कोरिया येथे झालेल्या सामंजस्य करारासंदर्भात सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, या महत्वाकांक्षी मार्गासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी तत्वत: मान्यता दिली आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाने सुद्धा अकरा हजार कोटी रुपये उपलब्ध करुन दिले असून या महामार्गासाठी निधीचा प्रश्न नसल्याचे त्यांनी सांगितले. देशातील पहिल्या इलेक्ट्रॉनिक क्लस्टरसाठी केंद्र शासनाने मान्यता दिली असून या प्रकल्पामुळे नागपूर येथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहेत.


चांगी विमानतळाप्रमाणेच नागपूर व पुण्याचा विकास
नागपूर विमानतळावर कार्गो हब सुविधा उपलब्ध होण्यासोबतच पुणे विमानतळाच्या विकासासाठी जगातील सर्वोत्कृष्ट चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळ बनविणाऱ्या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. मुंबईच्या पायाभूत सुविधा वाढविण्याची गरज लक्षात घेऊन रस्ते आणि रेल्वेचा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. यासाठी निती आयोगाने मान्यता दिली आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यालाही मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


अजनी येथे मल्टीमॉडेल हब
नागपूर मेट्रो या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम अत्यंत चांगल्या दर्जाचे होत असून सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे सांगताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मेट्रो प्रकल्पासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने महा कार्ड मेट्रो सुरु होण्यापूर्वी सुरु केले आहे. हे कार्ड सर्वत्र वापरता येणार असून या प्रकल्पासाठी उपयुक्त ठरणार आहे. अजनी येथे मल्टी मॉडेल हब बांधण्यात येणार असून त्यासाठी ८०० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. यासाठी सेंट्रल जेल, सिंचन विभागाच्या कॉलनीची जागा तसेच वेअर हाऊसच्या सुमारे ७००-८०० एकर परिसरावर जागतिक दर्जाचे सुविधा केंद्र राहणार आहे.

खापरी येथे कार्गो हब बांधण्यात येणार असून यासाठी केंद्र शासनाने वाराणसी व नागपूर येथे या प्रकल्पाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम येत्या दोन महिन्यात सुरु होणार असून विमानांसाठी इंधन भरण्याचे सुविधा उपलब्ध होईल. आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि कार्गो हबमुळे येत्या पाच वर्षात ५० हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. नागपूरच्या युवकांना प्राधान्याने रोजगार देण्याची सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली.






—Pics by Kunal Lakhotia